कृष्णात पाटील, झी 24 तास, मुंबई :  मुंबईकरांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईत पावसाने दांडी मारल्याने मुंबईकरांवर 10 टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र आता ही पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोठा दिलासा मिळालाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत जून महिन्यात पावसाने मोठी दांडी मारली होती. पावसाबाबत हवामान विभागाने अंदाज वर्तवून सुद्दा हवा तसा पाऊस पडला नव्हता. परीणामी मुंबईकरांवर पाणी संकट ओढवणार होते. आणि तसेच झाले. जून महिन्यात मुंबईस पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात कमी पाऊस पडल्याने जलसाठा तळाला गेला होता. त्यात उपलब्ध जलसाठा लक्षात घेऊन पर्जन्यवृष्टीत वाढ होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात २७ जून  पासून १० टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. 


दरम्यान जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला होता. या पावसामुळे तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आजपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातील १० टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णय़ाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.  


25.94 टक्के जलसाठा उपलब्ध 
मुंबई महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये मिळून संपूर्ण मुंबई महानगराला पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतका असावा लागतो. त्या तुलनेत दिनांक 27 जून 2022 रोजी 1 लाख 31 हजार 770 दशलक्ष लिटर म्हणजे 9.10 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. आज 3 लाख 75 हजार 514 दशलक्ष लिटर म्हणजे 25.94 टक्के एवढा उपयुक्त जलसाठा उपलब्ध आहे.


महापालिकेचे नागरीकांना आवाहन 
तलाव क्षेत्रात समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्याने महानगरपालिकेतर्फे लागू करण्यात आलेली 10 टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे, असे महानगरपालिका प्रशासनातर्फे कळविण्यात येत आहे. तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध होत असला तरी,नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.