मुंबई : पूल दुर्घटनेनंतर करण्यात आलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही मुंबईतील जुन्या धोकादायक पुलांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही मुंबईतल्या जुन्या धोकादायक पुलांकडे दुर्लक्ष होत आहे. पुलांची दुरुस्ती, पुनर्बांधणीचे  काम रखडल्याचा मुद्दा उपस्थित करून प्रशासनाच्या उदासिनतेबाबत बुधवारी स्थायी समितीत नगरसेवकांनी प्रशासनाला धारेवर धरले. १०० वर्ष जुना असलेला दादरच्या धोकादायक टिळक ब्रिजची दुरुस्ती कधी होणार असा सवाल शिवसेनेने स्थायी समितीत उपस्थित केला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावर मुंबईतील सर्व पुलांचा फेरआढावा घेऊन आवश्यक असल्यास पुन्हा स्ट्रक्चरल ऑडिट केले जाईल असे आश्वासन प्रशासनाने दिले. मुंबईतील ३१४ पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. यात धोकादायक पुलांची दुरुस्ती आणि पुनर्बांधणीचे काम पालिकेने हाती घेतले आहे. पादचारी आणि रेल्वे पुलांचे  स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर त्यात २९ पूल अतिधोकादायक असल्याचे समोर आले होते. 


या अहवालात अनेक पुलांची दुरुस्तीही सुचवण्यात आली. तर अतिधोकादायक पूल पाडण्यात आले आहेत. मात्र काम अत्यंत धिम्यागतीने सुरु आहेत. तर काही पुलांच्या स्ट्रक्चरल ऑडिटनंतरही दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली नाहीत. पुलांच्या दुरुस्तीच्या कामात प्रशासनाची उदासीनता, तर नगरसेवक कुरघोडीच्या राजकारणात मश्गूल असल्याचं चित्र आहे.