सुस्मिता भदाणे, झी मीडिया, मुंबई : लहानपणी तुम्ही गाढव आणि गाढववाल्याची गोष्ट वाचली असेल ना...? पण आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत अशाच एका गाढववाल्याची गोष्ट. या गाढववाल्याकडं एक नाही, तर तीन गाढवं आहेत. या गाढवांचं तो काय करतो? चला पाहूयात...


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सर्दी, खोकला अशा आजारांनी त्रासलेल्या मुलांवर इथं चक्क उपचार सुरू आहेत आणि उपचार करतोय तो चक्क गाढववाला... सुभाष जाधव... धक्का बसला ना..? पण हे खरं आहे.


चमचाभर दुधासाठी ५० रुपये


लहान मुलांना गाढविणीचं दूध पाजलं की, त्यांचे आजार बरे होतात, असं मानलं जातं. या गाढविणीच्या दुधाला प्रचंड मागणी आहे. एका चमचाभर दुधासाठी तब्बल ५० रूपये मोजावे लागतात. तरी देखील कुलाब्यापासून अंधेरीपर्यंत आणि सीएसटीपासून कुर्ल्यापर्यंत अनेक मुंबईकर ग्राहक सुभाष जाधव आणि त्यांच्या या गाढविणीची वाट पाहत असतात.


डॉक्टरांचं मत मात्र, थोडं वेगळचं


गाढविणीच्या गळ्यातल्या घुंगरांचा आवाज ऐकला की, आयाबाया आपल्या तान्हुल्यांला घेऊन घराबाहेर येतात. विविध रोगांसाठी गाढविणीचं दूध गुणकारी असतं, अशी ग्राहकांची धारणा असली तरी डॉक्टरांचं मत मात्र थोडं वेगळं आहे. सायन रुग्णालयातील नवजात शिशूतज्ञ डॉ. जयश्री मोंडकर यांनी सांगितलं की, बाळाला गाढवाच्या दुधातून इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते.


दुधाला फारच मागणी


गाढविणीचं दूध गुणकारक की अपायकारक, याबाबत मतभेत असले तरी सुभाष जाधव आणि त्यांच्या गाढविणीच्या दुधाला फारच मागणी आहे. दरदिवशी नित्यनेमानं ते आपल्या गाढवासोबत सकाळी ६ वाजताच चेंबूरच्या घरातून पडतात आणि दुपारी २ वाजता घरी पोहोचतात.


दिवसभराची कमाई अवघी...


दिवसभर एवढी मेहनत करून, उन्हातान्हात पायपीट करून त्यांच्या पदरात पडतात ते जेमतेम ५०० ते ६०० रुपये. पण त्यांच्या वडिलांपासून चालत आलेला हा गाढवाच्या दूधविक्रीचा व्यवसाय ते वर्षानुवर्षं करतायत. पुढची पिढी मात्र, हा व्यवसाय करेल का, याबाबत ते स्वतःच साशंक आहेत.


इजिप्तची राणी क्लिओपात्रा आपलं सौंदर्य जपण्यासाठी गाढविणीच्या दुधानं स्नान करायची, अशी दंतकथा आहे. गाढवं केवळ ओझी वाहण्यासाठी नसतात. तर तुमचं सौंदर्य खुलवण्यासाठी आणि आरोग्य जपण्यासाठीही उपयोगी ठरू शकतात, हेच या गाढववाल्याच्या गोष्टीचं तात्पर्य.



मुंबई | आरोग्यासाठी गाढविणीचे दूध गुणकारी