मुंबई : महानगरपालिकेच्या विविध रुग्णालयांतून आतापर्यंत ६ मृतदेह गायब झाल्याप्रकरणी पालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. या स्पष्टीकरणात त्यांनी ६ मृतदेह बेपत्ता झाले नसल्याचं सांगितलं आहे. केईएम, नायर, सायन, जोगेश्वरी ट्रॉमा, कांदिवली, शताब्दी या रुग्णालयांतील मृतदेहांच्या प्रकरणांचा उलगडा झाला असून त्याप्रकरणी वेळोवेळी प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आल्याचं सांगण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नातेवाईकांशी संपर्क होत नसल्याने किंवा नातेवाईकांशी उशिरा संपर्क झाल्याने या घटना घडल्या असल्या, तरी त्याचे प्रशासनाने कधीही समर्थन केलेलं नाही. ६ पैकी ५ प्रकरणांत मृतदेहांची ओळख पटली. त्याबाबत नातेवाईकांना माहिती देण्यात आली किंवा कोविड मार्गदर्शक तत्त्वानुसार पोलीस प्रशासनासह योग्य ती कार्यवाही करण्यात आली आहे. 


राजावाडी रुग्णालयातील मृतदेह प्रकरणाबाबत चौकशीचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले असून त्याची वस्तुस्थिती स्पष्ट करणारा खुलासा स्वतंत्रपणे पाठवण्यात येत आहे. वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ नये, तसेच आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, अशी विनंती महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात आली आहे. घाटकोपर येथील महानगरपालिकेच्या राजावाडी रुग्णालयातील शवागारातून एक मृतदेह बेपत्ता झाल्याच्या घटनेची महापालिका प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेशही महापालिकेकडून देण्यात आले आहेत. पुढील 5 दिवसात त्यांना या घटनेबाबतचा अहवाल देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 


या प्रकरणात दोषी आढळून येणाऱ्या व्यक्तींवर, महापालिका सेवानियमावलीनुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असंही सांगण्यात आलं आहे.


वाचा : शताब्दी हॉस्पिटलमधून बेपत्ता झालेल्या वृद्धाचा मृतदेह सापडला