मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या निमित्ताने बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी हजारो शिवसैनिक शिवाजी पार्कवर दाखल होत आहेत. यावेळी मुस्लीम बांधवानी देखील शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी अजमेर शरीफची चादर चढवली. शिवसेना मुस्लीम समाजा सोबत आहे. महाराष्ट्रातील मुस्लीम हे शिवसेनेसोबत आहेत. असं यावेळी मुस्लीम शिवसैनिकांनी म्हटलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्कवर फुलांची सजावट करण्यात आली आहे. बाळासाहेबांनी आदरांजली वाहण्यासाठी अनेक नेते शिवाजी पार्कवर पोहोचत आहेत. शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी देखील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. आमदार प्रताप सरनाईक आणि शिवसेनेच्या पदाधिकारी प्रियंका चतुर्वेदी यांनी देखील स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांनी अभिवादन केलं. 


मनोहर जोशी, दीपक केसरकर आणि नीलम गोऱ्हे यांनी देखील स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केलं. काँग्रेस नेते भाई जगताप यांनी देखील बाळासाहेबांनी आदरांजली दिली. राजकीय घडामोडींसाठी नव्हे तर गेली सात वर्षे आपण बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते भाई जगतापांनी दिली. 


राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनानिमित्त ट्विट करत बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक व्हिडिओ शेअर करत बाळासाहेबांसोबतच्या आठवणी जागवल्या आहेत.