प्रथमेश तावडे, झी मीडिया, विरार : रागाच्या भरात एखादी व्यक्ती कोणत्या थराला जाईल याची काही शाश्वती नाही. शुल्लक कारणावरुन होणाऱ्या वादातून अनेकदा जीव गेल्याचे धक्कादायक प्रकार घडले आहेत. नालासोपाऱ्यातही (Nalasopara Crime) असाच काहीसा धक्कादायक प्रकार घडला आहे. बाईकचा (Accident News) धक्का लागल्याने एका तरुणीचा हत्या करण्यात आल्याचा प्रकार नालासोपाऱ्यातील उड्डाणपुलावर घडला आहे. बाईकचा धक्का लागल्याच्या रागातून झालेल्या भांडणात एका तरुणाला जीव गमवावा लागला आहे. अज्ञातांनी तरुणाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नालासोपारा पोलीस (Nalasopara Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुचाकीच्या आरशाच्या धक्का लागल्याने झालेल्या वादातून एका तरुणाची हत्या करण्यात आल्याचा प्रकार नालासोपारा येथे घडला आहे. नालासोपारा उड्डाणपूलावर रविवारी संध्याकाळी ही घटना घडली. रविवारी संध्याकाळी रोहित यादव (20) आणि विकेश चौधरी हे दोन तरुण दुचाकीवरून नालासोपारा पूर्वेला जात होते. सव्वा चारच्या सुमारास नालासोपारा उड्डाणपूलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीने दुसर्‍या एका दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यांच्या दुचाकीचा दुसर्‍या दुचाकीच्या आरशाला धक्का लागला.


धक्का लागलेल्या त्या दुचाकीवर तीन तरुण होते. आरशाला धक्का लागल्याच्या कारणावरुन त्यांच्यात उड्डाणपुलावरच वाद सुरु झाला. दुचाकीवर असलेल्या तिघा आरोपींनी या रोहित आणि विकेशला मारहाण करायला सुरवात केली. दिवसाढवळ्या हा प्रकार सुरू असताना कुणीही त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला नाही. तिघांनी केलेल्या मारहाणीत रोहित यादव याला गंभीर दुखापत झाली. जखमी रोहितला तात्काळ नालासोपारा पूर्वेला असलेल्या पालिकेच्या तुळींज रुग्णालयात दाखल करण्यात आले. 


मात्र उपचारा दरम्यान रोहित यादवचा दुर्दैवी मृत्यू झाला. मयत रोहीत हा नालासोपारा पूर्वेच्या संतोष भुवन येथे राहणारा होता. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हत्या करणारे तिन्ही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.


दरम्यान, बाईक ओव्हरटेक करताना रोहितच्या दुचाकीचा धक्का आरोपींच्या दुचाकीला लागला. यावरून वाद होऊन त्याला मारहाण करण्यात आली होती, अशी माहिती नालासोपारा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास सुपे यांनी दिली. आम्ही सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहोत अशीही माहिती विलास सुपे यांनी दिली.