अंबरनाथ : कोरोनाने सगळं जग ठप्प झालं आहे. हे दिवसही सरतील आणि पुन्हा एकदा आपलं धावपळीचं आयुष्य सुरू होईल. पण, त्यामुळे आताचा क्षण जगणं कोणी सोडत नाही ना? त्यातही या काळात आपल्या-पहिल्या वहिल्या बाळाचा जन्म झाला असेल, तर तो आनंद साऱ्या जगाबरोबर साजरा करावा, असं प्रत्येक आई-बापाला वाटणं सहाजिकच आहे. कारण, हे दिवस आयुष्यात परत येत नाहीत. आपल्या बाळाच्या बारशाचं स्वप्नही प्रत्येक आई-बापानं पाहिलेलं असतं. एक अनोखं ऑनलाईन बारसं अंबरनाथमध्ये पार पडलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१७ फेब्रुवारी २०२० ला श्रुती गद्रे यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर श्रुती बाळाला घेऊन त्यांच्या माहेरी अंबरनाथला गेल्या. बाळाच्या जन्मामुळे संपूर्ण गद्रे आणि ओक कुटुंबामध्ये आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण होतं.


बाळाचं आगमन होताच श्रुती आणि त्यांचे पती मंगेश गद्रे यांनी बारसं दणक्यात करण्याचं ठरवलं. यासाठी तारीखही निश्चित केली. बारशासाठी हॉलची शोधाशोधही सुरू झाली, पण लॉकडाऊनमुळे बाळाचं बारसं धुमधडाक्यात कसं करायचं? हा प्रश्न गद्रे दाम्पत्याला सतावत होता. हौसेला मोल नसतं असं म्हणतात, गद्रे आणि ओक कुटुंबानेही बारशाची हौस पूर्ण करण्यासाठी अनोखा मार्ग काढला. झूम ऍपवरून बारसं करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. बाळाच्या बारशासाठी लागणारे पेढे आणि पाळण्याची सजावट गद्रे आणि ओक कुटुंबाने घरीच केली.



अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर बाळाला पाळण्यात घालण्यात आलं. अंबरनाथच्या घरामधून बाळाबरोबर आई, बाबा, आजी आणि मावशी होते. तर ठाण्याहून बाळाची आजी, गोव्यावरून बाळाचे मामा-मामी, कुवेतवरून बाळाची आत्या, डोंबिवलीवरून आणखी नातेवाईक आणि मीरारोड, बोरिवलीवरून श्रुती आणि मंगेश यांचे मित्र ऑनलाईन होते. संपूर्ण कुटुंब ऑनलाईन आल्यानंतर बाळाच्या मावशीने त्याचं नाव 'आराध्यज' ठेवलं.



गद्रे आणि ओक कुटुंबाने टेक्नॉलॉजीचा वापर करुन बाळाचं बारसं केलं. सोशल डिस्टन्सिंग ठेवत नियमांचं कुठेही उल्लंघन होणार नाही, याची खबरदारी घेऊन हा सोहळा पार पडला.



लॉकडाऊनची जेव्हा घोषणा करण्यात आली त्याच्या काही तास आधीच बाळाचे वडील मंगेश गद्रे ठाण्यावरून अंबरनाथला गेले होते. तेव्हापासून ते अंबरनाथमध्येच आहेत. लॉकडाऊनची घोषणा आधी झाली असती किंवा मंगेश यांनी बाळाकडे जायला थोडा जरी उशीर केला असता, तर त्यांनाही कदाचित आपल्या बाळाच्या बारशाला ऑनलाईनच उपस्थिती लावावी लागली असती.