मुंबई : कोकणात राजापूर येथील नाणार प्रकल्पाला महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी तीव्र विरोध केलाय. पैशांसाठी कोकण भस्मसात करण्याचा शिवसेनेचा डाव असल्याचा घणाघाती आरोप राणे यांनी यावेळी केला.


आंबा, काजू, नारळ पिकाला मोठा धोका


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी जिल्ह्यातला नाणारमधल्या रिफायनरी प्रकल्पामुळे येथील आंबा, काजू आणि नारळ शेतीची वाट लागणार आहे. तसेच देवगड येथील देवगड हापूसलाही याचा मोठा फटका बसणार आहे. तसेच मासेमारीवरही या प्रकल्पाचा भविष्यात परिणाम दिसून येईल. कारण या प्रकल्पातून रासायनिक पाणी सोडल्यानंतर त्याचा हा धोका मासेमारी व्यवसायाला पोहोचणार आहे.


'हा प्रकल्प होऊ देणार नाही'


शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि केंद्रीय उद्योगमंत्री अनंत गिते यांनीच नाणारचा प्रकल्प कोकणात आणल्याचा आरोप राणे यांनी केला. तसंच पैशांसाठी शिवसेनेनं कोकण भस्मसात करण्याचा डाव आखल्याचाही घणाघाती आरोप राणेंनी केलाय. कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प होऊ देणार नाही, असा निर्धार राणेंनी व्यक्त केलाय. 


शिवसेनेमुळे हा प्रकल्प कोकणात


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रकल्प शिवसेनेने आणला आहे, हे जाहीर भाषणात सांगितले. त्याबाबतचे वृत्त अनेक वृत्तपत्रांतून आले आहे. त्याची कात्रणे माझ्याकडे आहेत. त्यामुळे शिवसेनेचा उद्योग मंत्री राज्यात आणि केंद्रात अनंत गिते हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांच्याच कृपेने हा प्रकल्प आणला गेला आहे. अनंत गिते यांनी दुसऱ्या राज्यातील प्रकल्प हा निसर्गरम्य कोकणात आणलाय. त्यामुळे या प्रकल्पामागे शिवसेनाच आहे. त्यांचा हा दुटप्पीपणा आहे, अशी टीका राणे यांनी यावेळी केली.