दीपक भातुसे, प्रतिनिधी, झी मीडिया मुंबई : नारायण राणेंचा भाजपा प्रवेश आणखी लांबण्याची चिन्हं आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची कल्याण डोंबिवली महापालिकेतील समस्यांबाबत बैठक पार पडली. मात्र उद्धव ठाकरे केवळ या विषयासाठी वर्षावर गेले नव्हते. नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. यातूनच कालच्या मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत राणेंच्या प्रवेशला उद्धव ठाकरे यांनी विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळली आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी दिल्लीला पंतप्रधानांच्या बैठकीला गेले होते. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांच्या भाजपा प्रवेशाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्याशी चर्चाही केली होती. सूत्रांच्या माहितीनुसार मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री याबाबत राणेंशी चर्चा करणार होते. मात्र उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी राणेंशी अद्याप चर्चा केली नसल्याचे समजते. त्यामुळे नारायण राणेंचा काही दिवसांवर आलेला भाजपा प्रवेश लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.