नारायण राणे म्हणतात, नितेश चुकीचं वागला
प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवण्यात आले.
मुंबई: मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्याच्या निषेधार्थ आमदार नितेश राणे यांनी गुरुवारी महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांना चिखलाने आंघोळ घातली. नितेश राणे यांच्या उपस्थितीत स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर बादलीतून आणलेला चिखल ओतला. यानंतर प्रकाश शेडेकर यांना गडनदीवरील पुलावर बांधून ठेवण्यात आले. ही घटना आज चांगलीच चर्चेत राहिली.
मात्र, नितेश राणे यांचे वडील नारायण राणे यांनी आपल्या मुलाचे हे कृत्य चुकीचे असल्याचे सांगितले. महामार्गावरील खड्ड्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करण्यात काही गैर नाही. मात्र, नितेशच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक कृतीचे समर्थन करता येणार नाही. मी कदापि त्याला पाठिंबा देणार नाही, असे नारायण राणे यांनी म्हटले.
काही दिवसांपूर्वी कणकवलीती बाजारपेठेमध्ये पाणी घुसले होते. दरम्यान, महामार्गावरील चिखल आणि खड्ड्यांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी अखेर आज आपला रोष महामार्ग उपअभियंता प्रकाश शेडेकर यांच्यासमोर व्यक्त केला. शेडेकर यांना गडनदीवरील पूलापासून जाणवली येथील पुलापर्यंत चालत नेण्यात आले. यानंतर त्यांच्या अंगावर चिखल ओतण्यात आला. महामार्गावरून प्रवास करताना सर्वसामान्यांना होणाऱ्या त्रासाचा अनुभव उपअभियंत्यांनाही व्हावा यासाठी, त्यांच्यावर चिखल ओतल्याचे नितेश यांनी सांगितले.