नारायण राणेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभीमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. आज संध्याकाळी सहा वाजता राणे आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली.
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर या दोघांमध्ये भेट झाली. या भेटीला खुद्द नारायण राणे यांनी दुजोरा दिला आहे. पण चर्चेचा तपशील सांगायला मात्र नारायण राणे यांनी नकार दिला आहे. लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचं नारायण राणेंनी स्पष्ट केलं आहे. विधान परिषद पोटनिवडणूक आणि मंत्रिमंडळातल्या समावेशाबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्यावर विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. येत्या ७ डिसेंबर ही निवडणूक होणार आहे. भाजपचे 122, शिवसेनेचे 63 , काँग्रेसचे 42, राष्ट्रवादी 41 तर इतर पक्षाचे 20 आमदार आहेत. भाजप आणि इतर पक्ष एकत्र आले तरी जिंकण्यासाठी लागणारा 145चा आकडा गाठता येत नाही.
तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आले तर एकूण आकडा 146 म्हणजे बहुमतापेक्षा जास्त होतो. पण नितेश राणे आणि कालिदास कोळंबकर यांची मतं काँग्रेसच्या गोटात जाणार नाही अशी स्थिती आहे. राष्ट्रपती निवडणूकीच्या वेळी भाजपला महाराष्ट्र विधानसभेतल्याच काही अदृश्य हातांनी मदत केली होती...त्यामुळे आता राणेंच्या निवडणूकीत कोणाचे अदृश्य हात मदतीला येतात हे बघणं औत्सुक्याचं आहे.
शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणेविरोध बघता ही निवडणूक राणेंना सोपी जाणार नाही असं सध्याची राजकीय समीकरणं सांगत आहेत. राणेंना पुन्हा विधानपरिषदेवर यायचं असेल, तर या निवडणूकीत शिवसेना, काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यापैकी एका पक्षाचा पाठिंबा मिळावावा लागेल. त्यापैकी शिवसेना आणि काँग्रेस राणेंना पाठिंबा देणं केवळ अशक्य आहे.