Election results 2019: आता निवडणूक लढवावी की नाही, हा प्रश्न पडलाय- नारायण राणे
हा निकाल धक्कादायक असून निवडणुकीच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपच्या त्सुनामीपुढे विरोधी पक्ष अक्षरश: भुईसपाट झाले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, यापुढे निवडणूक लढवावी की नाही, असा प्रश्न मला पडला आहे. हा निकाल धक्कादायक असून निवडणुकीच्या विश्वासर्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या निवडणुकीत हेराफेरी झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे यापुढे निवडणूक लढवावी की नाही, असा प्रश्न पडल्याचे नारायण राणे यांनी म्हटले.
लोकसभा निवडणुकीच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये भाजपप्रणित एनडीएने ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी ३५० जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. तर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीला (यूपीए) १०० पेक्षा कमी जागा मिळतील, असे चित्र दिसत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी हे पाच वर्षांची टर्म पूर्ण करून पुन्हा सत्तेत येणारे पहिले बिगरकाँग्रेसी पंतप्रधान ठरले आहेत.
तर महाराष्ट्रातही शिवसेना-भाजपने जोरदार मुसंडी मारल्यामुळे विरोधकांचे पानिपत झाले आहे. महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी २३ जागांवर भाजप तर १८ जागांवर शिवसेनेच्या उमेदवारांनी विजय आघाडी घेतली आहे. यापैकी बहुतांश मतदारसंघांमध्ये महायुतीचा विजय निश्चित मानला जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पाच आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. ०१४ सालच्या मोदी लाटेत काँग्रेसला नांदेड आणि हिंगोली या दोन जागांवर समाधान मानावे लागले होते. नांदेडमधून अशोक चव्हाण आणि हिंगोलीतून राजीव सातव विजय झाले होते. मात्र, यंदा शिवसेना आणि भाजपच्या जोरदार मुसंडीमुळे काँग्रेसला या दोन जागाही गमवाव्या लागल्या आहेत. आता काँग्रेस केवळ चंद्रपूरातील जागेवर आघाडी टिकवून आहे. ही जागादेखील हरल्यास महाराष्ट्र 'काँग्रेसमुक्त' होईल.