दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केलाय. तसेच मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांची भेट कशासाठी झाली यावरही त्यांनी आपलं मत मांडलंय. त्यासोबतच नाणार प्रकल्पाबाबत त्यांची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केलीये.


‘...तर कोकणातून शिवसेना हद्दपार होईल’


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नारायण राणे म्हणाले की, ‘नाणार हा प्रकल्प आल्यास कोकणातून शिवसेना हद्दपार होईल, या भीतीने ते काल मुख्यमंत्र्यांना भेटले.
माझा उद्धव ठाकरेंना प्रश्न आहे उद्योग खाते सुभाष देसाई यांच्याकडे आहे आणि जमीन संपादन करण्यासाठी याच खात्याकडून होते आहे. मग तुमच्या उद्योग मंत्र्यांना सांगून नाणार प्रकल्पाची परवानगी रद्द का करत नाहीत. 


उद्धव ठाकरेंकडून जनतेची दिशाभूल


पर्यावरण खाते शिवसेनेचे रामदास कदम यांच्याकडे आहे, ते पर्यावरणाची परवानगी रद्द का करत नाहीत. उद्धव ठाकरे हे न करता मुख्यमंत्र्यांना का भेटतात. नाणारबाबतचा करार मॅग्नेटिक महाराष्ट्रात करण्याचा निर्णय आठ दिवसांपूर्वी करण्याचा निर्णय झाला. या करारावर उद्योगमंत्री सही करणार आहेत. मग आठ दिवसांपूर्वीच हा करार रद्द का केला नाही. आता मुख्यमंत्र्यांना भेटून उद्धव ठाकरे जनतेची दिशाभूल करतायत. 


‘मी हा प्रकल्प होऊ देणार नाही’


हा प्रकल्प आंध्र मधून कोकणात आणला. त्यासाठी विनायक राऊत यांनी जागा दाखवण्याचे मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात सांगितले आहे. आता लोक विरोधात जात आहेत तर ही दिशाभूल केली जात आहे. मी हा प्रकल्प होऊ देणार नाही. हा प्रकल्प कोकण उद्ध्वस्त करणारा आहे. जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीनेही हा प्रकल्प घातक आहे. त्यामुळे मी हा प्रकल्प कदापि होऊ देणार नाहीत. मीही मुख्यमंत्र्यांकडे वेळ मागितला आहे, प्रकल्पाला विरोध करणाऱ्या स्थानिकांना घेऊन भेटणार आहे.


‘एकही वीट रचू देणार नाही’


११ लाख आंबा आणि २ लाख काजूची झाडं आहेत. पोलिसांकडून जबरदस्ती करून जमीन संपादित केली जात आहे. सरकारकडून विरोध करणाऱ्यांच्या जीवाला धोका आहे. करार झाला तरी आम्ही कोकणात प्रकल्पाची एक वीटही रचू देणार नाही. काही झालं तरी हा प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. संघर्ष समितीच्या लोकांना बरोबर घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. कोकणात इंजिनिअरिंग, ऑटो, टेक्स्टाईल प्रकल्प आणा पण केमिकल प्रकल्प आणू देणार नाही.