नारायण राणे महाराष्ट्रातून भाजपचे राज्यसभा उमेदवार
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्विकारली आहे.
मुंबई : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी भाजपची राज्यसभेची ऑफर स्विकारली आहे. त्यामुळे ते आता अधिकृतरित्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सामिल होणार आहेत. सोमवारी, १२ मार्च रोजी ते राज्यसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तसे राणे यांनी आज स्पष्ट केलेय.
राणेंची भाजपकडून बोळवण
राणे यांना महाराष्ट्र मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल. त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, अशी माहिती वेळोवेळी प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. तसे जाहीर केले होते. मात्र, राणेंना खासदारकी देऊन त्यांची भाजपने बोळवण केलेय.
मुख्यमंत्र्यांशी उद्या भेट
सुरुवातीला भाजपच्या राज्यसभा प्रस्तावावर नारायण राणे यांनी विचार करुन निर्णय घेण्याची भूमिका घेतली होती. ते राज्यसभेसाठी उत्सुक नव्हते. त्यांना केंद्रात नव्हे तर राज्याच्या राजकारणातच रस असल्याचे सांगण्यात येत होते. तसे त्यांचे चिरंजीव आमदार नितेश राणे यांनी ट्विट करुन स्पष्ट केले होते. मात्र, अखेर राणें यांनी भाजपची ही ऑफर मान्य केली. दरम्यान, ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या भेट घेणार आहेत.