मुंबई : आरक्षणाबाबत शरद पवारांनी आताच का प्रश्न उपस्थित केला? असा सवाल नारायण राणे यांनी केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत ज्या पद्धतीने आर्थिक निकषाची भाषा आली, ती पवारांकडून अपेक्षित नव्हती, असंही राणे म्हणालेत.


यापूर्वी आरक्षण देत असताना, या विषयावर अनेक आंदोलनं होत असताना आणि त्या विषयांवर आपलं मत देत असताना पवारांनी 'आर्थिक निकष' हा शब्द कधी वापरला नव्हता... पहिल्यांदाच पवारांनी हा शब्द वापरलाय... असं म्हणत राणेंनी पवारांच्या या विधानावर आश्चर्य व्यक्त केलंय. 


सोबतच, पवारांच्या या मताशी मी सहमत नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलंय. 


राजकीय वर्तुळात खळबळ


एकीकडे मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन सुरू असताना आर्थिक निकषांवर आरक्षण द्यायला हवं, अशी भूमिका मांडून शरद पवारांनी खळबळ उडवून दिलीय. शरद पवारांनी आरक्षणबाबत मांडलेल्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना काँग्रेसची तारांबळ उडाल्याचं दिसतंय. काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पवारांचं थेट समर्थन किंवा या भूमिकेला थेट विरोध करणं टाळलंय. तर शिवसेनाप्रमुख जेव्हा आर्थिक निकषावर आरक्षण द्या म्हणत होते, तेव्हाच त्यांची भूमिका स्वीकारली असती, तर आज जातींच्या भिंती उभ्या राहिल्या नसत्या, असं म्हणत बाळासाहेब कळायला जरा उशीरच झाला, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलीय.