बागेश्री कानडे, झी २४ तास, मुंबई : सामाजिक कार्यकर्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर यांच्यावर ज्या पिस्तूलातून गोळ्या झाडण्यात आल्या ती पिस्तूल खूनानंतर कळव्याच्या खाडीत टाकल्याची कबुली आरोपींनी दिलीय. समुद्रात या पिस्तुलाचा शोध घेण्याची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. मागच्या न्यायालयीन सुनावणी दरम्यान परवानगी न दिल्यामुळे न्यायालयानं राज्य सरकारला खडसावले होते. त्यानंतर शुक्रवारी यासाठी परवानगी देण्यात आल्याचं कोर्टात राज्य सरकारच्यावतीनं सांगण्यात आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयनं सनातन संस्थेचा सदस्य आणि ईएनटी सर्जन विरेंद्रसिंह तावडे, शूटर सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना अटक केलीय. २० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी गोळ्या घालून नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती.



पुढच्या दोन दिवसांत परदेशी यंत्र आणि परदेशी पाणबुडे बोलवण्यात आलेले आहेत. पाणबुडे परवा येणार आहेत. मात्र, सध्या पावसाचा जोर आहे. सर्वत्र पूरपरिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर पाऊस कमी झाल्यावर आमचं शोध कार्य सुरू होईल, अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी कोर्टाला दिली.


तर यावेळी खाडीत उतरताना मॅनग्रोव्हजचं कोणत्याही प्रकारे नुकसान होता कामा नये, याची काळजी राज्य सरकारने घेतली आहे. त्या अनुषंगाने मॅनग्रोव्हज सेल आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांची संयुक्त भेट खाडीच्या ठिकाणी झाली. त्यानंतर खाडीत शोध कार्य कसं करायचं? याची पडताळणी करण्यात आली. अशी माहिती राज्य सरकारच्या वकिलांनी कोर्टाला दिली. १५ ते ३० दिवस हे शोधकार्य सुरू राहण्याची शक्यता आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता १६ सप्टेंबर रोजी होणार आहे. 


ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात दाभोलकर कुटुंबीयांनी एक याचिका दाखल केली आहे. याचिकेच्या सुनावणी दरम्यान सीबीआयच्यावतीने कोर्टाला ही महत्त्वाची माहिती देण्यात आली.