`संस्कृत भाषेमुळेच संगणक क्षेत्रात मोठी क्रांती होईल`
नासानेही संस्कृत भाषेचे मोठेपण मान्य केले आहे.
मुंबई: भविष्यात केवळ संस्कृत भाषेच्या मदतीने बोलणारे संगणक तयार करता येतील. 'नासा' या जगप्रसिद्ध संस्थेने ही बाब मान्य केली आहे, असा दावा केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल यांनी केला. ते शनिवारी मुंबई आयआयटी संस्थेच्या ५७ व्या दीक्षांत सोहळ्यात बोलत होते.
यावेळी पोखरियाल यांनी म्हटले की, नासाच्या माहितीनुसार भविष्यात बोलणारे संगणक तयार करायचे असतील, तर ते केवळ संस्कृत भाषेच्या मदतीने करणे शक्य आहे. कारण, संस्कृत ही जगातील एकमेव शास्त्रीय भाषा आहे. संस्कृतमध्ये जे बोलले जाते तेच लिहले जाते. त्यामुळे केवळ संस्कृत भाषेच्या मदतीनेच बोलणारे संगणक तयार करता येतील.
याशिवाय, पोखरियाल यांनी चरक ऋषींनीच अणू आणि रेणू या संकल्पनांचा शोध लावल्याचा दावा केला. आयुर्वेदाच्या क्षेत्रात चरक ऋषींचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. मात्र, त्यांनीच जगात सर्वप्रथम अणू आणि रेणूंवर संशोधन केले, असे पोखरियाल यांनी म्हटले.
भाजपच्या अनेक नेत्यांनी यापूर्वी अशाप्रकारचे दावे केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही काही वर्षांपूर्वी 'इस्रो'च्या शास्त्रज्ञांसमोर अशाप्रकारचे विधान केले होते. आधुनिक विज्ञानातील अनेक गोष्टींचा उगम भारतीय पुराणात असल्याचे त्यांनी म्हटले होते.
याशिवाय, बालाकोट एअरस्ट्राईकच्यावेळी आकाशात ढग असतानाच वायूदलाने हल्ला करावा, असा सल्ला दिल्याचे मोदींनी सांगितले होते. जेणेकरून ढगांमुळे भारतीय विमाने रडारच्या कक्षेत येणार नाहीत. मोदींच्या या वक्तव्यावर अनेकांनी टीका केली होती.