राहुल गांधींचे वक्तव्य योग्यच ;राज्यात कॉंग्रेसचे नाही महाविकास आघाडीचे सरकार - नवाब मलिक
महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही
मुंबई : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचे वक्तव्य योग्यच आहे कारण महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही तर महाविकास आघाडीचे सरकार आहे असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिले आहे. कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रात कॉंग्रेसचे सरकार नाही असे वक्तव्य केले होते. त्यावर बोलताना नवाब मलिक यांनी त्यांच्या वक्तव्याचा अर्थ स्पष्ट केला आहे.
तीन पक्षांनी स्थापन केलेले हे महाविकास आघाडी सरकार आहे. तिन्ही पक्ष जनतेच्या सेवेसाठी एकजूट आहोत आणि कोरोना संकटाच्या काळात आम्ही एकजुटीने काम करत आहोत असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
काय म्हणाले होते राहुल गांधी
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी, महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत. पण मोठे निर्णय घेण्याचे आम्हाला अधिकार नाहीत. पण महाराष्ट्रातलं सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे, असं ते म्हणाले.
सरकारमध्ये असलो तरी मोठे निर्णय घेण्याचा अधिकार आम्हाला नाही असं म्हणत त्यांनी महाराष्ट्रातल्या कोरोना स्थितीची जबाबदारी झटकली आहे. पण त्याचवेळी सरकार मजबूत आहे आणि आमचा त्यांना पाठिंबा आहे असं सांगत आम्ही ठाकरे सरकारबरोबर असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून मदत मिळाली पाहिजे. आम्ही केवळ केंद्र सरकारला सूचना देऊ शकतो, परंतु सरकारला काय वाटते हे पूर्णपणे त्यांच्यावर अवलंबून आहे.
मुंबई, दिल्ली ही महत्त्वाची केंद्र असल्याने येथे अनेकांची ये-जा असते, अधिक कनेक्टटेड असलेल्या जागी कोरोनाची स्थिती अधिक आहे. त्यामुळे यांसारख्या शहरांत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळत आहेत. महाराष्ट्रात आम्ही सरकारमध्ये आहोत मात्र आम्ही मोठे निर्णय घेऊ शकत नाही. परंतु, पंजाब, छत्तीसगड, राजस्थानमध्ये आमच्याकडे निर्णय घेण्याचे अधिकार असल्याचं ते म्हणाले.