नवी मुंबई : कोरोना व्हायरच्या coronavirus पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे थेट परिणाम हे अनेकांच्या दैनंदिन जीवनावर झाले. नोकरीवर गदा येण्यापासून मग त्याच्याशी निगडीत संपूर्ण साखळीच अशी काही गुंतली की, सारी गणितंच कोलमडून गेली. काहींना आपल्या नोकरीला मुकावं लागलं आहे, काहींच्या वेतनात कपात झाली आहे तर, काहींना नोकरी असूनही जवळपास गेले पाच- सहा महिने वेतनच मिळालेलं नाही. ही संकटं कमी म्हणून आता काही शाळांकडून पालक वर्गाला फी भरण्याची सक्ती करण्यात येत आहे ज्यामुळं आता नवी समस्या पालकांपुढे उभी राहिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवी मुंबईतील साधू वासवानी इंटरनॅशनल स्कूल या शाळेनं तर, पालकांना एक नोटीसवजा पत्रच पाठवलं आहे. फी भरण्यासाठीचे पैसे नसल्याच एज्युकेशन लोन अर्थात शिक्षणासाठी कर्ज घेण्यासंबंधीचं पत्र पाठवलं आहे. यात भर घालणारं दुसरं उदाहरण म्हणजे नवी मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूलकडून पालकांना एज्युकेशन लोन घेण्यासाठी म्हणून बँकेचं नावही सुचवलं आहे. 


हा संपूर्ण प्रकार पाहता पालकांकडून आता संताप व्यक्त करण्यात येत आहे. अनेकदा उच्च शिक्षणासाठी कर्ज काढलं जातं. पण, आता नर्सरीपासूनच्याच शिक्षणासाठी कर्ज घेण्याची वेळ येते की काय, अशाच पेचात हे पालक पडले आहेत. संबंधित शाळा प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून मात्र याबाबतची कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. सदर शाळांचं प्रशासन आणि कार्यकारिणी फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप काही पालकांनी केला आहे. 


 


लॉकडाऊन संपावं आणि विद्यार्थ्यांकडून शंभर टक्के फी वसुली करावी अशीच या शाळांची भूमिका असून, पालक आणि विद्यार्थ्यांपुढे अडचण निर्माण करण्याचा हा पवित्रा पाहता पालक वर्गानं त्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. बरं, शाळेनं मागणी केलेल्या फी मध्ये ट्युशन, टर्म, लॅब इतकंच नव्हे तर प्रवासासाठीच्या फीचासुद्धा समावेश आहे. परिणामी आमची परिस्थिती जाणून घ्या आणि त्यानंतर अशी कोणतीही मागणी करण्याचा विचार करा असा संतप्त सूर पालकांनी आळवला आहे.