मुंबई : खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्याविरोधात नागपुरात पोलिसात तक्रार केली आहे. जीवे मारण्याची धमकी आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची लेखी तक्रार खासदार नवनीत राणा यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सोपवली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नागपूर इथल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी राणा दाम्पत्याला उद्देशून 20 फूट खड्ड्यात गाडण्याची आणि स्मशानात गोवऱ्या रचून ठेवण्याची भाषा केली होती. यावरुन संजय राऊत यांच्यावर 153(A),294,506 भादवी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची  मागणी युवा स्वाभिमानने केली असून याबाबत नागपूर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना निवेदन आणि लेखी तक्रार दिली.


खासदार नवनीत रवी राणा यांना जातीवाचक शिवीगाळ आणि जाहीरपणे जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या संजय राऊत यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा(एक्ट्रोसिटी )अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नवनीत राणा यांनी केली आहे. 


संजय राऊत यांनी काय दिला होता इशारा?
मुंबईत येऊन मातोश्रीवर घुसून हनुमान चालीसा वाचणं, अशा प्रकारची भाषा, नुसती वापरली नाही तर जणू काही आम्ही महान योद्धे आहोत, सत्यवादी आहोत, अशा प्रकारचा आव आणून अमरावतीचे बंटी आणि बबली मुंबईत आले.  कृपा करुन शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका, मातोश्रीशी छेडछाड करु नका, 20 फूट खाली गाडले जाल, शिवसेनेच्या संयमाची परीक्षा पाहू नका, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता.


आम्ही अमरावतीत जाऊ, पाहू अमरावती कोणाचं आहे, यापुढे जर कोणी शिवसेनेच्या नादाला लागलं, तर त्यांनी आपल्या गोवऱ्या स्मशानात रचून यावं, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.