मुंबई : महाविकास आघाडी सरकारमधील अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik)यांच्या समोरच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीएत. मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) पुन्हा वाढ करण्यात आली आहे. नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत आज संपत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज त्यांना सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 4 एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीने (NCP) नवाब मलिक यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याची तयारी केली आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Udhav Thackeray) यांनाफोन करुन याबाबत चर्चा केल्याची माहिती आहे. यावेळी नवाब मलिक यांच्याकडची खाती इतर मंत्र्यांकडे सोपवण्याबाबत चर्चा झाल्याचं सांगण्यात येत आहे. यासंदर्भातला एक प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.


त्यानुसार अल्पसंख्याक विभागाची जबाबदारी गृहमंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्याकडे तर कौशल्य विकास विभागाची जबाबदारी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडे सोपवण्यात यावी अशी भूमिका शरद पवार यांनी घेतली आहे. नवाब मलिक यांच्या खात्यातील कामं मागे पडू नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 


तसंच याआधी नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या परभणी आणि गोंदियासाठीही नव्या पालकमंत्र्यांची नेमणूक केली जाणार आहे. परभणीसाठी धनंजय मुंडे तर गोंदियासाठी प्राजक्त तनपुरे यांचं नाव देण्यात आलं आहे.