Nawab Malik यांची एक किडनी खराब, पण जामिनावर तात्काळ सुनावणीस हाय कोर्टचा नकार
मनी लॉण्ड्रींग प्रकरणी अटकेत असलेल्या Nawab Malik यांना दिलासा नाहीच, मलिक यांच्या जामन अर्जावर आता थेट नविन वर्षातच सुनावणी
मेघा कुचिक, झी मीडिया, मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या न्यायालयीन कोठडीत (Judicial Custody) जरी असले तरी खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना फेब्रुवारी 2022 मध्ये ईडीने (ED) अटक केली होती. डॉन दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याची बहिण हसिना पारकर (Haseena Parkar) हिच्याकडून कुर्ल्यामध्ये जमीन विकत घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. दहशतवाद्यांशी संबंधित व्यवहार, जमीन हडप करणे एकूणच मनी लॉड्रींग (Money Laundering) प्रकरणी ईडीने त्यांना अटक केली होती. या प्रकरणात त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. मात्र गेले काही महिने ते किडनीच्या त्रासामुळे (Kidney Problems) खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.
जामिनावर तात्काळ सुनावणीस कोर्टाचा नकार का ?
या केसमध्ये नवाब मलिक यांनी पीएमएलए कोर्टात (PMLA Court) जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र पीएमएलए कोर्टाने त्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला होता. पीएमएलए कोर्टाच्या निर्णयाला त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) आव्हान दिलं. आज या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी नवाब मलिक यांचे वकील ऍड. अमित देसाई यांनी युक्तिवाद केला की नवाब मलिक यांना किडनीचा त्रास आहे. त्यांची एक किडनी खराब झाली आहे. नवाब मलिक सध्या एकाच किडनीवर आहेत. तरी ईडी मात्र त्यांच्या डिस्चार्जसाठी घाई करत आहे.
नवाब मलिक यांची तब्येत गंभीर असेल आणि त्यांच्यावर कैदेत उपचार शक्य नसेल तर आम्ही तातडीची सुनावणी घेऊ असे मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं. नवाब मलिक बऱ्याच काळापासून रुग्णालयात भरती आहेत मग घाई का ? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने उपस्थित करत नवाब मलिक यांच्या जामिन याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला. आता नवाब मलिक यांच्या जामिन याचिकेवर 6 जानेवारी रोजी सुनावणी होईल. तर दोन आठवड्यांमध्ये ईडीला या याचिकेवर उत्तर सादर करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
नक्की काय आहे प्रकरण ?
नवाब मलिक यांना मनी लॉड्रींग प्रकरणी अटक करण्यात आली होती. मुंबईतील कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांच्यावर आरोप आहेत. मनी लॉड्रींग प्रकरणी अटक करण्यात आलेल्या इक्बाल कासकर यांच्या चौकशी दरम्यान मलिक यांचं नाव समोर आलं होतं. २३ फेब्रुवारी २०२२ रोजी नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतले आणि त्याच दिवशी अटक केली. कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम रिअल इस्टेटच्या माध्यमातून टेरर फंडिंग करतो आणि रिअल इस्टेटचे व्यवहार हे मनी लॉड्रींगच्या माध्यमातून केले जातात. या संदर्भात जवळपास नऊ ठिकाणी ईडीने धाडसत्र राबवले होते.