मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज सकाळी एक पत्रकार परिषद घेत एनसीबी (NCB) अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर आणखी एक आरोप केला. एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने दिलेलं पत्र त्यांनी दाखवलं. या पत्रात समीर वानखेडे यांच्या 26 फ्रॉड केसेसचा उल्लेख असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी करण्याची मागणी नवाब मलिक यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यासंदर्भात नवाब मलिक यांनी एनसीबी महासंचालकांना पत्र पाठवलं असून त्यासोबत त्यांनी आपलं तक्रार पत्रही पाठवलं आहे. या बेनामी पत्रातील आरोपांची चौकशी करावी अशी मागणी मलिक यांनी या पत्राद्वारे केली आहे. 


नवाब मलिक यांना दोन दिवसांपूर्वी हे पत्र मिळालं आहे, याची प्रत मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि डीजी तसंच काँग्रेसच्या अध्यक्षांनाही पाठवली आहे. एनसीबीच्या कार्यालयात एक ग्रुप तयार झाला असून खोटी प्रकरणं तयार केली जात असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी झाल्यास अनेक माहिती उघड होईल, असं मलिक यांनी म्हटलं आहे.


त्या पत्रात नेमकं काय?


पत्र पाठवणारा एनसीबीचा कर्मचारी असल्याचा त्यात उल्लेख असून आपण गेल्या दोन वर्षांपासून मुंबईत कार्यरत असल्याचं या व्यक्तीचं म्हणणं आहे. समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना कोणत्याही मार्गाने बॉलिवूड कलाकारांना ड्रग्स प्रकरणात अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली जात होती, त्यातला काही हिस्सा राकेश अस्थाना यांनाही दिला जात होता असा आरोप या पत्रातून करण्यात आला आहे.