रेमंड ग्रुपचे चेअरमन गौतम सिंघानिया सध्या आपल्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. गौतम सिंघानिया यांच्या पत्नी नवाज मोदी यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे खळबळ माजली असताना आता आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये नवाज मोदी गौतम सिंघानिया यांनी आपल्याला विना पाणी, अन्न तिरुपतीच्या पायऱ्या चढण्यास लावल्याचा दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑडिओ क्लिपमध्ये नवाज मोदीने दावा केला आहे की, लग्नाआधी गौतम सिंघानिया यांनी जर लग्नास तयार असेल तर आंध्र प्रदेशातील तिरुमला येथील तिरुपती मंदिराच्या पायर्‍या चढून जाण्याची शपथ दिली होती. आपला हा शब्द पाळताना त्यांनी तिला अन्न आणि पाणी न घेताच प्रवास करण्यास भाग पाडलं.


"त्यांनी मला सर्व पायऱ्या चढायला लावल्या. मला तिथे किती पायऱ्या आहेत याची कल्पना नाही, पण काहीही न खाता, पिता मी त्या सर्व पायऱ्या चढल्या. मी दोन ते तीन मिनिटांसाठी बेशुद्ध पडले होते. त्यांना काही काळजीही नव्हती. त्यांनी त्यांनंतरही मला चालायला लावलं," असं नवाज मोदी यांनी सांगितलं आहे.


नवाज मोदींच्या आरोपांमुळे सिंघानिया यांच्या सार्वजनिक व्यक्तिमत्त्वाला तडा जाताना दिसत आहे. कारण गौतम सिंघानिया भगवान व्यंकटेश्वराचे भक्त आहेत, ज्यांना तिरुपती मंदिर समर्पित आहे. सिंघानिया यांनी आपली ही भक्ती मुंबईतील नवीन मंदिराच्या उभारणीसाठी 100 कोटी रुपयांची देणगी आणि TTD शैक्षणिक संस्थांसोबतच्या त्यांच्या सहभागामुळे अधोरेखित केली होती.


नवाज मोदी यांनी आपल्या ऑडिओ क्लिपमध्ये गौतम सिंघानिया तिरुपतीचे भक्त का आहेत यावरही विधान केलं आहे. "गौतम सिंघानिया इतर कोणत्याही नाही पण भगवान व्यंकटेश्वराचे इतके मोठे भक्त आहेत, कारण तो पैशांचा देवता आहे," असं त्यांनी म्हटलं आहे. 


रेमंड ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आपली आलिशान जीवनशैली तसंच वेगवान कार, नौका यांच्या आवडीसाठी ओळखले जातात. सध्या ते नवाज मोदींसोबतच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहेत. नवाज मोदी यांनी सिंघानियाच्या अंदाजे 11 हजार 658 कोटींच्या संपत्तीमधील 75 टक्के संपत्तीची मागणी केली आहे.