मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतरच महाराष्ट्रात जातीय अस्मितेचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडलं आहे. मुंबईत पत्रकार परिषदेत बोलतांनी शरद पवार यांनी राज ठाकरे यांना दोन शब्दातच खोचक उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपावर शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी, पवार म्हणाले, 'राज ठाकरे यांच्या विधानावर भाष्य न करणंच बरं, माझा त्यांना सल्ला आहे त्यांनी जरा प्रबोधनकारांचे लिखाण वाचावे, असं शरद पवार म्हणाले. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.


राज ठाकरे यांनी केला होता आरोप


राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर थेट आरोप केला होता. 'महाराष्ट्रात जात ही गोष्ट आधीपासूनच होती. मात्र, स्वजातीचा अभिमान इतपतच ती मर्यादित होती. आत मात्र जात ही नेत्यांची ओळख झाली आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतरच जातीचा मुद्दा हा सर्वार्थाने मोठा झाला आहे, असा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.


प्रवीण गायकवाड यांनीही केली टीका


'राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलीकडं इतिहासाचं आकलन नाही. तसंच, त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचंही आकलन नाही. राजकारणात कुठलंही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करतोय,' अशी टीका संभाजी बिग्रेडचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केली आहे.