संपवणाऱ्या पक्षाला जनतेने... शरद पवार यांचा राज ठाकरे यांना टोला
प्रबोधनकारांचा दाखला देत नास्तिक असल्याच्या आरोपांवर शरद पवारांनी दाखवला आरसा
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपल्या भाषणात मनसे हा संपणारा नाही तर संपवणारा पक्ष आहे असा उल्लेख केला होता. यावर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी टोला लगावला आहे.
महाराष्ट्राच्या मतदारांनी त्यांच्या पक्षाची योग्य दखल घेतली आहे. त्यामुळे मतदारांनी त्यांच्या पक्षाला एकही जागा दिलेली नाही. त्यांच्या सभा मोठ्या होत्यात. त्यांच्या सभेत शिवराळ भाषा असो, नकला असो या सगळ्या गोष्टींमुळे करमणूक होते, त्यामुळे लोक जातात, असा टोला शरद पवार यांनी लगावला.
राज ठाकरे यांनी शरद पवारांनी नास्तिक म्हटलं, यावरही शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. मी देव किंवा धर्माबद्दल प्रदर्शन करत नाही. मी तेरा-चौदावेळा निवडणूकीला उभा राहिलो, मी एकच नारळ फोडतो बारामतीला एक मंदिर आहे तिथे, पण त्याचा कधी आम्ही गाजावाजा करत नाही.
माझ्यासमोर काही आदर्श आहेत. त्यात प्रबोधनकार ठाकरेंचा आदर्श आहे. प्रबोधनकार ठाकरे यांचं लिखाण वाचलं तर यासंदर्भातलं मार्गदर्शन होईल. प्रबोधनकार ठाकरे यांनी देव धर्म यांच्या नावाने बाजार मांडणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहेत त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात टीका टिप्पणी केलेली आहे. याचा अर्थ त्यांना अनादर करायचा आहे असं नाही तर त्याचा गैरफायदा कुणी घेत असेल तर त्याला ठोकून काढायचं काम प्रबोधनकारांनी केलं आहे.
प्रबोधनकारांचं लिखाण आम्ही वाचतो, सर्वच वाचतात असं नाही त्यामळे अशा प्रकारची विधान केली गेली असा टोला शरद पवार यांनी राज ठाकरे यांना लगावला आहे.
अजित पवार यांच्या घरावर धाड पडते सुप्रिया सुळे यांच्या घरावर धाड पडत नाही या राज ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देताना शरद पवार यांनी हा पोरकट आरोप असल्याचं म्हटलं आहे. अजित पवार आणि मी वेगळा आहे का असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.