मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. सध्याच्या राजकीय घडामोडींवर पवार-ठाकरे भेटीत चर्चा होण्याची शक्यता असून काँग्रेसकडून वारंवार मांडल्या जाणाऱ्या स्वबळाच्या भूमिकेवरही चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक खुल्या पद्धतीने घेण्याबाबत चर्चा केली जाणार असल्याचं बोललं जात आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या स्वबळाच्या विधानावरून महाविकास आघाडीत सध्या नाराजी आहे. काँग्रेसच्या स्वबळाच्या नाऱ्यामुळे राष्ट्रवादी आणि शिवसेनेत चलबिचल होताना दिसत आहे. त्यामुळे काँग्रेसचं नेमकं धोरण काय, अशी चर्चाही सुरू आहे.


त्याआधी शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथिगृहावर महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांनी कृषी संदर्भातील विविध मुद्यांचा आढावा घेतला. तसंच एसटी कामगारांच्या प्रश्नावरही चर्चा झाली. या बैठकीला राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संदीपान भुमरे उपस्थित होते. या बैठकीतल्या मुद्द्यांवरही शरद पवार मुख्यमंत्र्याशी चर्चा करण्याची शक्यता आहे.