मुंबई : राज्यातील पालघर जिल्ह्यात २ साधूंसह एकाची जमावानं मारहाण करून हत्या केली. या प्रकरणावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पहिल्यांदा आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या प्रकरणी शरद पवार म्हणतात, गैरसमजाने घटना घडली याचा अर्थ असा नाही की राज्यात कायदा आणि सुव्यवस्था ठिक नाही. पालघरमध्ये जे काही झालं ते व्हायला नको होतं. जे काही घडलं ते दुर्देवी आणि निंदनीय आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांचा बचाव करताना शरद पवार म्हणाले, घटनेनंतर पोलिसांनी त्वरीत कारवाई करत घटनेतील संबंधित १०० लोकांना त्याच रात्री ताब्यात घेतलं. पोलीस या प्रकरणी काटेकोर चौकशी करत आहेत.


पवार यावर पुढे बोलताना म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेवर बोलले आहेत, कडक कारवाईसाठी जे काही करायला हवं होतं, ते सर्व त्यांनी केलं आहे. पण काही लोक कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. जी घटना घडली ती अफवेमुळे घडली. जे झालं ते योग्य नाही तसेच कायद्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणे देखील योग्य नाही.


पालघरमध्ये शुक्रवारी जमावाने २ साधुंसह एकाची मारहाण करून हत्या केली. यात एक व्हिडीओत काही लोक त्यांच्यामागे लाठ्या काठ्या घेऊन त्यांना मारहाण करताना दिसत आहेत. घटनास्थळी पोलीस आले असतानाही, त्यांना न जुमानता मारहाण सुरूच आहे, असं व्हिडीओत दिसतंय. या प्रकरणी ११० लोकांना अटक करण्यात आली आहे. तर ९ जणांना बालसुधारगृहात पाठवण्यात आलं आहे.


या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी सुरू असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटलं आहे. तर अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन करून घटनेची माहिती घेतली आहे. यावरून केंद्राने देखील हे प्रकरण गंभीरतेने घेतल्याचं स्पष्ट होत आहे.