`ना थका हूँ ना हारा हूँ`! शरद पवार 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौऱ्यावर, `या` मतदारसंघातून सुरुवात
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होती. पण त्यानतंर पावसामुळे पुढच्या सभा थांबवल्या होत्या. आता पुन्हा एकदा शरद पवार राज्यव्यापी दौऱ्यासाठी सज्ज झाले आहेत आणि याची सुरुवात ते बीड मतदारसंघातून करणार आहेत.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 17 ऑगस्टपासून राज्यव्यापी दौरा सुरू करणार असल्याचं समजतंय. कृषीमंत्री धनंजय मुंडेंच्या बीडमधून (Beed) ते आपल्या दौऱ्याला सुरूवात करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसमधील सूत्रांनी दिलीय. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पवारांनी पहिली सभा अन्न नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळांच्या मतदारसंघात घेतली होता. भुजबळांनंतर आता धनंजय मुंडे यांच्याकडे पवारांना मोर्चा वळवलाय.
पहिली सभा नाशिकमध्ये
राष्ट्रवादीत (NCP) बंडखोरी झाल्यानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) राज्यव्यापी दौरा करण्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांनी पहिली सभा छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात घेतली. भाजपशी हातमिळवणी करणाऱ्या अजित पवारांना साथ देणाऱ्या आपल्या विश्वासू छगन भुजबळांचं बंड शरद पवारांच्या चांगलेच जिव्हारी लागलं होतं. त्यामुळे त्यांनी पहिली सभा नाशिकमध्ये घेतली. पण त्यानंतर त्यांनी कोणताही दौरा केला नव्हता. पावसाळी वातावरणामुळे त्यांनी दौरा थांबवला होता. पावसाचा अंदाज घेऊन लकरच दौऱ्याची तारीख जाहीर करणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यानुसार आता 17 ऑगस्टपासून शरद पवार राज्यव्यापी दौर करणार आहेत.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा उल्लेख करताना एक मुरब्बी नेता म्हणून आवर्जून त्यांची ओळख करून दिली जाते. हाच नेता वयाच्या 83 व्या वर्षी राष्ट्रवादीत पुन्हा एकदा पक्षबांधणी करताना दिसणार आहे. आपल्यांनीच दगा दिलेला असताना ही बंडखोरी उलथून पाडत नव्यानं उभं राहण्याची वेळ पवारांवर आली आहे. न खचता अत्यंत मिश्किलपणे खिलाडूवृत्तीनं पवार या आव्हानाला सामोरं जातायत.
राष्ट्रवादीला यापूर्वीही पडलं खिंडार...
2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वीही राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडलं होतं. अनेक आजी-माजी आमदार पक्ष सोडून जात होते. दिग्गज नेते भाजपप्रवेश करत होते. पवारांचं राजकारण संपलं अशी टीका पवारांवर होत होती. काँग्रेस-राष्ट्रवादीचे 10 आमदारही निवडून येणार नाहीत असे प्रहार भाजप-शिवसेनेकडून होत होते. मात्र त्याही परिस्थितीत पवार उभे राहिले. राज्यभर पायाला भिंगरी लावून फिरले. भर पावसात सभा घेतली आणि एकतर्फी वाटणारा सामना फिरवला. तेव्हाही पवार वयाच्या 80 व्या वर्षात प्रवेश करत होते. पण, उत्साह मात्र एखाद्या तरुण नेत्याला लाजवेल इतका. आपल्या विचारांनी पद्धतीनं पवारांनी प्रचारात स्वत:ला झोकून दिलं अन् भाजपच्या एकहाती विजयात शड्डू ठोकून उभे ठाकले.
83 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात
अजित पवारांसह राष्ट्रवादीतले काही आमदार सरकारमध्ये सामील झाल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांसमोर आव्हान उभं ठाकलंय. घरातून आव्हान उभं ठाकल्यानंतरही ना पवारांचा मिश्किलपणा कमी झाला, ना लढाऊ वृत्ती. पुन्हा एकदा पक्ष बांधण्यासाठी पवार सज्ज झाले आहेत.वयाच्या 83 व्या वर्षी पवार सज्ज झालेत.