Mahavikas Aaghadi Government: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात आलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीतील संभ्रम वाढला आहे. त्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलेल्या वक्त्यव्यामुळे महाविकास आघाडीतील पक्षांनी नाराजी व्यक्त केली आहे. बंडखोर आमदारांना आवाहन करत मुंबईत या, महाविकास आघाडीतून बाहेर पडतो, असं संजय राऊत यांनी सांगितलं आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांना विश्वासात घ्यायला हवं होतं असं त्यांनी सांगितलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"त्यांनी महाविकास आघाडीच्या इतर नेत्यांशी चर्चा करायला हवी होती. त्याच्या काय अडचणी त्यांनी सांगायला पाहीजे. शिवसेना स्वतंत्र पक्ष आहे, त्यांच्या निर्णय घेण्यास ते स्वतंत्र आहेत. त्यांनी आवाहन केलं आहे की, तुम्ही या आम्ही सत्तेतून बाहेर पडतो. कुठलाही पक्ष त्यांना सत्तेत राहायचं की नाही ठरवू शकतात. कुणी बाहेर पडलं आणि सरकार अडचणीत आलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजिबात काळजी करत नाही. विरोधी पक्षात बसून जनतेची सेवा करण्याची आणि लढण्याची सवय चांगल्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसला आहे. आमच्यासाठी ते काही नविन नाही. सत्ता येते, सत्ता जाते, कधी विरोधी पक्षात, तर कधी सरकारमध्ये. पण एकदा का त्यांनी आमचे नेते शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांना सांगायला हवं. यातला संभ्रम त्यांनी दूर करायला हवा.", असं छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे.


सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि शिंदे गटाच्या हालचाली
शिवसेनेचे बंडखोर मंत्री एकनाथ शिंदे गटाचे 50 आमदार आणि भाजप यांची युती होऊन राज्यात नवे सत्तासमीकरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजपकडूनही एकनाथ शिंदे गटाला उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे. तसेच 12 मंत्री होऊ शकतात, अशी शक्यता आहे. दरम्यान, महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी 144 हा स्पष्ट बहुमताचा आकडा आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांचे समर्थक  50 आमदार आणि भाजपचे समर्थक 114 आमदार असे मिळुन 164 आमदारांचे बहुमत विधान सभेत सिद्ध करुन राज्यात भाजप+शिवसेना ( शिंदे गट ) असे सरकार स्थापन करण्यासाठी राजकीय घडामोडी सुरु झाल्या आहेत.