मोठी बातमी: चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीच्या सदस्यत्वाचा राजीनामा
पक्षाचे बिनीचे शिलेदारच विरोधी गोटात सामील झाल्याने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
मुंबई: सचिन अहिर यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत दुसरा मोठा धक्का बसला आहे. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी शुक्रवारी रात्री पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे येत्या ३० तारखेला चित्रा वाघ भाजपमध्ये प्रवेश करणार, हे निश्चित मानले जात आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर चित्रा वाघ यांनी पुढील राजकीय वाटचालीविषयी अधिक भाष्य करण्यास नकार दिला.
ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिन मेळाव्यात शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना मुंबईवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, आता पक्षाचे बिनीचे शिलेदारच विरोधी गोटात सामील झाल्याने मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.
सचिन आहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे आणखी नेते फुटण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. ही शक्यता अखेर खरी ठरली आहे.
दरम्यान, येत्या ३० तारखेला चित्रा वाघ यांच्यासोबत मधुकर पिचड, वैभव पिचड हे नेतेही भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. याशिवाय, साताऱ्याचे राष्ट्रवादीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, दिलीप सोपल आणि बबनदादा शिंदे हे नेतेदेखील भाजपच्या संपर्कात असल्याचे समजते.