मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांमधील आरोप-प्रत्यारोपांना जोर आला आहे. प्रचारसभा आणि सोशल मीडियावर या सगळ्याचा पूरेपूर प्रत्यय येत आहे. विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही बुधवारी ट्विटरवरून भाजप नेत्यांना चिमटे काढले. गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश केला होता. हाच धागा पकडत मुंडे यांनी भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार यांना लक्ष्य केले. धनंजय यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर विडंबन करणारी कविता पोस्ट केली आहे. यामध्ये भाजपच्या राजकीय आऊटसोर्सिंगवर खरमरीतपणे ताशेरे ओढण्यात आले आहेत. आमच्या पक्षातील विझलेले दिवे घेऊन तुमच्या घरात उजेड पडेल काय, असा खोचक सवालही धनंजय मुंडे यांनी भाजपला विचारला आहे. 



धनंजय मुंडे यांनी यापूर्वीही राजकीय परिस्थितीवर खुमासदारपणे भाष्य करणारी ट्विट केली आहेत. युती झाल्यानंतर एरवी भाजपवर सतत आगपाखड करणाऱ्या शिवसेनेचा पवित्रा बराच मवाळ झाला होता. तेव्हा धनंजय यांनी हल्ली शिवसेनेचा गळा लता मंगेशकरांपेक्षाही गोड वाटतोय, अशी टिप्पणी केली होती.