#पुन्हानिवडणूक म्हणणाऱ्या कलाकारांनी माफी मागावी- धनंजय मुंडे
त्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हणत....
मुंबई : सोशल मीडियावर दररोज काही गोष्टी ट्रेंडमध्ये असतात. बहुविध कारणांनी एखादा हॅशटॅगही ट्रेंडमध्ये येतो. शुक्रवारी अशाच एका हॅशटॅगची चर्चा सोशल मीडिया आणि राजकीय वर्तुळात पाहायला मिळाली. हा हॅशटॅग होता #पुन्हानिवडणूक. मुख्य म्हणजे अनेक मराठी सेलिब्रिटींनी तो ट्विट केला होता.
सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सची एकंदर संख्या पाहता असा हॅशटॅग पोस्ट करण्यामागचं कारण काय, असा प्रश्न अनेकांच्या मनात घर करुन गेला, तर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी थेट या कलाकारांचा विरोध केला. अशा प्रकारे ट्विट करत जनतेची दिशाभूल करत त्यांना संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचं म्हणत त्यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली.
'काही कलाकारांनी #पुन्हानिवडणूक हा ट्विटर ट्रेंड सुरू केला आहे. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. त्यांनी जनतेची माफी मागावी. कलाकारांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीचं भान ठेवावं. या ट्रेंडमुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे', असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं.
मुंडे यांचं ट्विट पाहता त्यांची नाराजी स्पष्टपणे सर्वांसमक्ष आली आहे. महाराष्ट्रात सध्याच्या घडीला असणारा राजकीय पेच आणि सर्व परिस्थिती पाहता असे हॅशटॅग पोस्ट करण्यावर त्यांनी हरकत दर्शवली.
नेमकं काय आहे प्रकरण?
काही मराठी अभिनेत्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन #पुन्हानिवडणूक असा हॅशटॅग पोस्ट केला होता. सिद्धार्थ जाधव, अंकुश चौधरी, सई ताम्हणकर ही त्यापैकी काही कलाकारांची नाव.
मुळात हे सारंकाही एका चित्रपटासाठी करण्यात आलं. झी स्टुडिओच्या आगामी 'धुरळा' या चित्रपटासाठी करण्यात आलं होतं. राजकीय घडामोडींवर आधारित चित्रपचासाठीच असा हॅशटॅग पोस्ट करण्यात आला होता. पण, आता यावर मुंडेंची नाराजी पाहता ती कुठवर टीकणार हेही तितकंच महत्त्वाचं.