मुंबई : मनी लॉन्ड्रींगप्रकरणी ईडी कोठडीत असणारे राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईला हायकोर्टात आव्हान दिलं होतं. मात्र ईडी कारवाईतून न्यायालयाने मलिक यांना तातडीचा दिलासा दिलेला नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईडीने उत्तर देण्यासाठी वेळ मागितला आहे. त्यामुळे याप्रकरणाची पुढची सुनावणी आता सात मार्चला म्हणजे सोमवारी होणार आहे. उच्च न्यायालयाने तपासयंत्रणेला तातडीने उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, ३ मार्चला मलिक यांची ईडी कोठडी संपत आहे, याबाबात मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष PMLA कोर्टाने काहीही निकाल दिला तरी त्याचा या याचिकेवर परिणाम होणार नाही, असं न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.


मनी लॉन्ड्रींग आणि दाऊद इब्राहिमशी व्यवहाराचा ठपका ठेवत ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यानंतर त्यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली. मलिक यांच्यावर पीएमएलए कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 


ईडीने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याची मागणी करत नवाब मलिक यांनी हायकोर्टात धाव घेतली. आपणाला कोणतीही नोटीस न बजावता केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं मलिकांनी म्हटलं आहे. मलिक यांनी आपली तातडीने सुटका करण्याचे आदेश देण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली आहे. 


केंद्रीय तपास यंत्रणांचा केंद्र सरकार गैरवापर करत आहे, आपण विरोधकांच्या घोटाळ्याबाबत सातत्याने आवाज उठवतो, त्यामुळे ईडीने आवाज दाबण्यासाठी अशा पद्धतीने कारवाई केली. आपले कोणत्याही देशद्रोही आरोपीशी दाऊद इब्राहिमशी आपला काहीही संबंध नाही, असं मलिक यांनी याचिकेत म्हटलं आहे. 


नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही
दरम्यान, विरोधकांना कितीही गोंधळ घालायचा तेवढा घालू देत नवाब मलिक यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता नाही, असं राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी ठणकावलं आहे. नवाब मलिक यांच्यावर खोटे आरोप भाजप करत राजीनाम्याची मागणी करत आहेत, अशी टीकाही जयंत पाटील यांनी केली आहे.