प्रफुल्ल पटेल यांची १८ ऑक्टोबरला ईडीकडून चौकशी
इक्बाल मिर्ची याच्याशी आपला कोणताही संबंध नाही.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले आहे. कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार इक्बाल मिर्ची याच्यासोबतच्या आर्थिक आणि जमीन व्यवहार प्रकरणात त्यांचे नाव समोर आले होते. या पार्श्वभूमीवर ईडीने त्यांना १८ ऑक्टोबरला चौकशीसाठी पाचारण केले आहे.
प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेऊन या प्रकरणात आपली बाजू मांडली. यावेळी त्यांनी इक्बाल मिर्ची याच्याशी आपला कोणताही संबंध नसून मी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे सांगितले. माझ्या कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीचा इक्बाल मिर्चीच्या मालमत्तेशी संबंध नाही. तसेच सीजेमध्येही आम्ही कोणत्याही मालमत्तेचा सांभाळ किंवा त्याची मालकी आमच्याकडे नसल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले.
ईडी इक्बाल मिर्ची याच्या देशभरातील ३५ मालमत्ता जप्त करण्याच्या तयारीत आहे. यापैकी पटेल कुटुंबीयांच्या मिलेनियम डेव्हलपर्सने विकसित मुंबईच्या वरळी भागात विकसित केलेल्या सीजे हाऊस या बहुमजली इमारतीचाही समावेश आहे. सीजे हाऊसमधील दोन मजले इक्बाल मिर्चीची पत्नी हाजरा इक्बाल हिच्या नावावर करण्यात आल्याचा दावा ईडीकडून करण्यात आला होता. प्लॉट रिडेव्हलपमेंटच्या करारानुसार इमारतीच्या बदल्यात दोन मजले मेमन कुटुंबीयांना देण्यात आले होते. या दोन मजल्यांची किंमत जवळपास २०० कोटी रुपये आहे.
मात्र, पटेल यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. प्रसारमाध्यमांच्या हाती लागलेल्या काही कागदपत्रांवरून अफवा पसरवल्या जात आहेत. आरोप करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कागदपत्रांविषयी आपल्याला माहिती नसल्याचे पटेल यांनी सांगितले.