मुंबई : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने नियुक्तीचा आदेश जारी केला आहे. रुपाली चाकणकर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून महिला आयोगाचं अध्यक्षपद रिक्त होतं. अखेर या पदावर चाकणकर यांची नियुक्ती करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यात  महिला अत्याचाऱ्याच्या घटना वाढत आहेत. त्यातच राज्य महिला आयोगाचं (Maharashtra State Commission for Women) अध्यक्षपद गेल्या दीड वर्षापासून रिक्त होतं. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठया प्रमाणावर टीकेला सामोरं जावं लागत होतं. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला.


रुपाली चाकणकर आपल्या आक्रमक भाषणशैलीने ओळखल्या जातात. चित्रा वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर रुपाली चाकणकर यांना राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षपदाची संधी मिळाली. रुपाली चाकणकर यांनी राज्यभरात राष्ट्रवादी महिला संघटन मंजबूत करण्यासाठी प्रयत्न केले आहेत.


फडणवीस सरकारच्या काळात विजया रहाटकर यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पण महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर त्यांनी महामंडळ आणि विविध शासकीय पदावरील नियुक्त्या रद्द केल्या. त्याचबरोबर महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचं पदही रिक्त झालं होतं.