चेंबूर सामूहिक बलात्कार प्रकरणातील नराधम मोकाटच
आरोपींना कधी अटक होणार ?
अमर काणे, दीपाली जगताप-पाटील, झी मीडिया, मुंबई : मूळच्या जालन्याच्या तरुणीवर मुंबईतल्या चेंबूरमध्ये एक महिन्यापूर्वी सामूहिक बलात्कार झाला. एक महिना मृत्यूशी दिलेली झुंज अपयशी ठरली. तरूणीवर अत्याचार करणाऱ्या नराधमांची नावं सांगूनही पोलीस त्यांना अटक करत नाहीत. असा आरोप पोलिसांवर होत आहे.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल द्या आणि आरोपींना तातडीने अटक करा, अशा सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत.
शेवटी नातेवाईकांना घेऊन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. महिनाभर राज्य महिला आयोग आणि पोलीस झोपले होते का असा सवाल खासदार सुप्रिया सुळेंनी केला आहे.
दिल्लीतल्या निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणानंतर कायदा कठोर करण्यात आला. पण कायद्याची अंमलबजावणी करणारी यंत्रणा तशीच सूस्त आहे. हे चेंबूरमधील सामूहिक अत्याचार प्रकरणाने अधोरेखित झालं आहे.