नाना पटोले यांनी माहिती घेऊन आरोप करावे! पाळत ठेवल्याच्या आरोपावर राष्ट्रवादीचा हल्लाबोल
पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी अर्ज करावा गृहविभाग त्याबाबत निर्णय घेईल - नवाब मलिक
मुंबई : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर पाळत ठेवल्याचा आरोप केल्यानंतर राज्याच्या राजकारणात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. नाना पटोले यांच्या आरोपांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक (NCP Nawab Malik) यांनी उत्तर दिलं आहे.
नाना पटोले यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा केलेला आरोप हा माहितीअभावी केलेला आहे. सरकार कोणाचंही असो, आंदोलन, बैठका, जेव्हा असतात तेव्हा पोलीस विशेष विभाग ही माहिती संकलित करत असतो, पक्ष कोणताही असो ही माहिती घेण्याचं काम गृहविभाग करत असतो, सुरक्षेच्या दृष्टीने राजकीय नेत्यांच्या दौऱ्यांवर लक्ष असतं, असं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. नाना पटोले यांना जर हे माहित नसेल तर त्यांनी त्यांच्या पक्षातील माजी मुख्यमंत्र्यांकडून माहिती घेतली पाहिजे असा हल्लाबोल नवाब मलिक यांनी केला.
नाना पटोले यांना जर पोलीस बंदोबस्त नको असेल तर त्यांनी अर्ज करावा गृहविभाग त्याबाबत निर्णय घेईल, असंही नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.
'भाजप नेते धमकीवजा भाषा बोलू लागले आहेत'
गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार झाला. यामध्ये असा आभास निर्माण करण्यात येत आहे की मोदी सरकारने खात्याकडे विशेष लक्ष देण्यासाठी हे खातं तयार केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील भाजपचे नेते हे धमकीवजा भाषा बोलू लागले आहेत की आता काही खरं नाही. खरं तर राज्यातील सहकार विभाग हा राज्य सरकारच्या अधीन असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.