दीपक भातुसे, झी मिडिया, मुंबई : राज्यभरात अस्तित्वासाठी झगडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पक्षबांधणीच्या दिशेने तयारी सुरू केली आहे. त्यादृष्टीनेचे राष्ट्रवादीच्या राज्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत दोन दिवसांचे चिंतन शिबिर रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे आयोजित करण्यात आले आहे. आजपासून सुरू होणारे हे शिबिर दोन दिवस चालणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून १५ वर्ष सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून उतरता आलेख सुरू झाला. विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या प्रत्येक निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला.


महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत ते ग्रामपंचायत असा सर्वच निवडणुकीत राष्ट्रवादीची पिछेहाट सुरू आहे. एकेकाळी क्रमांक एकवर असलेल्या राष्ट्रवादीची घसरण चार क्रमांकावर झाली आहे.


राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रातही राष्ट्रवादीची घसरण सुरू असून या ठिकाणी भाजपाने शिरकाव केला आहे.


पक्षाचे अनेक बालेकिल्ले मागील तीन वर्षात झालेल्या निवडणुकीत ढासळले आहेत. विधानसभा निवडणुकीला आता दोन वर्ष शिल्लक असताना आपल्या अस्तित्वाची चिंता राष्ट्रवादीला सतावू लागली आहे. त्या दृष्टीने पक्षाच्या चिंतन शिबिरात चर्चा करून कार्यक्रम ठरवला जाणार आहे.


६ आणि ७ डिसेंबर असे दोन दिवस होणार्‍या या चिंतन शिबिरात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, धनंजय मुंडे यांच्यासह सर्व प्रमुख नेते, पक्षाचे आमदार, खासदार, माजी मंत्री, जिल्हा अध्यक्ष उपस्थित राहणार आहेत.



शिबिराच्या पहिल्या दिवशी


शेतक-यांचा प्रश्न, कर्जमाफीतील गोंधळ, नोटबंदी, जीएसटी, नागरीकरण, युवक, महिलांचे सबलीकरण या विषयांवर चर्चा केली जाणार आहे.


दुसऱ्या दिवशी ७ नोव्हेंबरला


पक्ष संघटना वाढ, राजकीय ठराव, पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट केली जाणार आहे. शरद पवार यांच्या भाषणाने चिंतन शिबिराची सांगता होणार आहे. पक्षातील नेते आणि कार्यकर्ते यांच्या मनात सत्ताधारी भाजपबरोबर असलेल्या पक्षाच्या संबंधांबाबत संभ्रम आहे. हा संभ्रमही दूर करण्याचा प्रयत्नही या शिबिराद्वारे केला जाणार आहे.