शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची बैठक संपली; शिवसेनेकडून पाठिंब्याचा प्रस्ताव
आता याठिकाणी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक काहीवेळापूर्वीच संपली आहे. यानंतर उद्धव ठाकरे पुन्हा मातोश्रीवर परतले आहेत. तर शरद पवार पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करायला यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पोहोचले आहेत. आता याठिकाणी ते राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढील दिशा ठरवतील.
दरम्यान, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात वांद्र्यातील ताज लँडस एन्ड हॉटेलमध्ये बैठक पार पडली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी सत्तास्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याचा अधिकृत प्रस्ताव शरद पवार यांच्यासमोर मांडला. या बैठकीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत आदित्य ठाकरेही उपस्थित होते. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारदेखील या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीतील अधिक तपशील समजू शकला नाही.