राष्ट्रवादीचा तोंडावळा ग्रामीणच राहिलाय, आता शहरांकडे वळा- शरद पवार
राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे.
अमित जोशी, झी २४ तास, मुंबई: आगामी काळात निवडणुकीत यशस्वी व्हायचे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेसची ग्रामीण भागातील पक्ष, ही ओळख बदलण्याची गरज असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. ते सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार वाढवायला पाहिजे. राष्ट्रवादीचा चेहरा ग्रामीण झाला आहे, ही बाब खरी आहे. त्यामध्ये काही चूक नाही. मात्र, ५० टक्के लोक शहरात राहतात. प्रत्येक तालुक्याचेही नागरीकरण झाले आहे. याकडे दुर्लक्ष करून आपल्याला संपूर्ण राज्यात यशस्वी होता येणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले.
त्यामुळे नागरीकरण झालेल्या भागांमध्ये राष्ट्रवादीचा विस्तार करण्याचा निर्धार आपण करुयात. त्यासाठी नागरी समस्या सोडवण्यासाठी आपण लोकांसोबत उभे राहिले पाहिजे. मुंबईत आपण जागा थोड्या लढवतो. मात्र, यावेळी किंवा विशेषतः महानगरपालिकेच्या वेळी जास्तीत जास्त कार्यकर्ते यांना संधी दिली पाहिजे तर पक्ष वाढेल. अनेकांना संधी मिळाली पाहिजे, असे मत यावेळी पवारांनी मांडले.
पवारांच्या या वक्तव्यामुळे आता राष्ट्रवादीत खांदेपालट होऊन नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी अटकळ बांधली जात आहे. जेव्हा आपण २० वर्षांपूर्वी पक्ष स्थापनेनंतर सत्तेत आलो तेव्हा अनेक तरुणांना संधी दिली, ते पहिल्यांदा मंत्री झाले. सर्व फळी तरुणांची होती. यामुळे पक्षाचा विस्तार होण्यास मदत झाली. आताही विचार करायला पाहिजे की, आता संघटनेच्या ठिकाणी किती नवीन फळी आहे? मला या गोष्टीची काळजी वाटते. त्यामुळे संघटनेतील चेहरे बदलून जास्तीत जास्त तरुणांना संधी दिली पाहिजे, असे शरद पवार यांनी सांगितले.
साध्वी प्रज्ञा यांच्यावर पवारांचा निशाणा
उद्या संसदेचे अधिवेशन सुरू होईल. यावेळी राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल. हे भाषण ऐकायला अनेक संसद सदस्य येतील, तिथे भगवीकरण झालेल्यांची संख्या जास्त असेल. अशाच विचारांची एक व्यक्ती मध्य प्रदेश मधून निवडून आली आहे. जिच्यावर अनेक गंभीर खटले आहेत. ही लोकशाही आणि राजकीय पक्षांना न शोभणारी ही गोष्ट आहे. मालेगाव बॉम्बस्फोटमध्ये काही मुस्लिम तरुणांना पकडले, तेव्हा मी म्हणालो की हे मला पटत नाही की, शुक्रवारच्या दिवशी मस्जिदमध्ये जाऊन मुस्लिम तरुण बॉम्बस्फोट करतील. सुदैवाने त्यावेळी काही चांगलेच अधिकारी या प्रकरणाचा तपास करत होते. या अधिकाऱ्यांनी ज्यांना अटक केली ते लोक आता संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावेळी आमच्याबरोबर असतील, असे पवारांनी म्हटले.