जागा वाटपात राष्ट्रवादी ५० टक्के जागांवर आग्रही राहणार
राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.
दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची जागा वाटपाची बोलणी येत्या बुधवारी १६ जुलै रोजी सुरू होत असून राष्ट्रवादी काँग्रेस यावेळी जास्त जागा मागण्याच्या तयारीत आहे. २०१४ ची विधानसभा निवडणूक दोन्ही पक्षांनी वेगळी लढवली होती. मात्र त्यापूर्वीची २००९ ची निवडणूक दोन्ही पक्षांनी आघाडी करून एकत्र लढवली होती. २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसने १७४ आणि राष्ट्रवादीने ११४ जागा लढवल्या होत्या. मात्र लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची सातत्याने खालावलेली कामगिरी लक्षात घेता यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीत ५०-५० टक्के जागा वाटपाची मागणी करण्याच्या तयारीत आहे.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने २ तर राष्ट्रवादीने चार जागा जिंकल्या होत्या, तर २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अवघी एक जागा जिंकली असून राष्ट्रवादीने ४ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसची सातत्याने होत असलेली घसरण लक्षात घेता यावेळी आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेस ५० टक्के जागा पदरात पाडण्यासाठी आक्रमक राहण्याची शक्यता आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीची जागावाटपाची प्राथमिक चर्चा झाल्यानंतर इतर मित्र पक्षांबरोबर दोन्ही काँग्रेस पक्ष जागा वाटपाची बोलणी सुरू करणार आहेत. इतर मित्र पक्षांमध्ये शेकाप, समाजवादी पक्ष, रिपब्लिकन कवाडे गट यासह अनेक लहान पक्षांचा समावेश आहे. वंचित बहुजन आघाडीलाही बरोबर घेण्याचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा प्रयत्न असणार आहे.