दीपक भातुसे, मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणूकीचं मतदान संपल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केल्याचं दिसतं आहे. दुष्काळाचा आढावा घेण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी उद्या मुंबईत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. पक्षाचे सर्व पदाधिकारी आणि प्रमुख नेते बैठकीला उपस्थित राहणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तयारीबरोबर राज्यातील दुष्काळ स्थितीचाही पवार या बैठकीत आढावा घेणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीचं मतदान २९ एप्रिल रोजी संपले आणि त्याच दिवशी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी राज्यात दुष्काळ दौरा काढला. राज्यात दुष्काळाची काय परिस्थिती आहे याची पवार प्रत्यक्ष पाहणी करणार होते, मात्र त्यांच्या पक्षातील एका आमदाराच्या मृत्यूमुळे पवारांना हा दौरा रद्द करावा लागला. आता दुष्काळाची स्थिती जाणून घेण्यासाठी शरद पवारांनी राज्यातील सर्व जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक बोलवली आहे. 


दुष्काळी आढाव्याबरोबरच राज्यात लोकसभा निवडणुकीत पक्षाची कामगिरी कशी असेल, तसेच पाच महिन्यांनी होणाऱ्या राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आतापासूनच काय तयारी करता येईल याबाबतही या बैठकीत चर्चा होणार आहे.


लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर होणाऱ्या राष्ट्रवादीच्या या बैठकीला पक्षाचे आमदार, खासदार, लोकसभा निवडणुकीतील उमेदवार, जिल्हाध्यक्ष तसेच पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहेत. काँग्रेसच्या तुलनेत राष्ट्रवादीने लोकसभा निवडणुकीची तयारीही आधीपासूनच सुरू केली होती.


लोकसभा निवडणुकीत काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीच्या जास्त जागा निवडून येण्याची शक्यता पक्षाला वाटतेय. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीची तयारीही लवकर करून राज्यात विधानसभा निवडणुकीत चांगली कामगिरी करण्याची पक्षाची रणनिती आहे.