NEP in Mumbai University: मुंबई विद्यापीठाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई विद्यापीठातील महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या शैक्षणिक वर्षापासून ही अंमलबजावणी होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. ३/४ वर्षीय पदवी अभ्यासक्रमांना विद्या परिषदेची मंजुरी मिळाली आहे. मुंबई विद्यापीठाकडून यासंदर्भात माहिती देण्यात आली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीत मुंबई विद्यापीठ पुढे असल्याचे सांगण्यात येत आहे. 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मुंबई विद्यापीठाने आघाडी घेतली असून पुढील शैक्षणिक वर्षापासून सर्व सलंग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 3/4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विद्या परिषदेच्या बैठकीत बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी. 3/४ 4र्षीय पदवी अभ्यासक्रमाना मंजुरी मिळाली आहे. 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने मानव्यविद्याशाखा, वाणिज्य आणि विज्ञान शाखेच्या 3/4 वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला असून शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून विद्यापीठातील सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना आता हे अभ्यासक्रम शिकता येणार आहेत. 


यापूर्वी मुंबई विद्यापीठाशी संलग्नित राज्यातील सर्वाधिक 62 स्वायत्त महाविद्यालयात 4 वर्षीय पदवीचे अभ्यासक्रम राबविण्याचा बहुमान मुंबई विद्यापीठाला मिळाला असून राष्ट्रीय धोरणानुसार प्रागतिक दृष्टिकोन ठेऊन सर्व ८१२ बिगर स्वायत महाविद्यालयासाठी विद्यापीठाने अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा तयार केला आहे.


मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित बिगर स्वायत्त महाविद्यालयात बी.ए., बी.कॉम. आणि बी.एस्सी  3/4 वर्षीय पदवी अभ्यासक्रम तयार करताना प्रा. रवींद्र कुलकर्णी समितीच्या अहवालातील शिफारशी, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय याचा सर्वंकष विचार करण्यात आला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण बहुउद्देशीय, बहुआयामी, लवचिक, रोजगाराभिमुख आणि कौशल्याची जोड असलेले अभ्यासक्रम उपलब्ध करुन दिले जाणार आहेत.


मुंबई विद्यापीठाच्या ८७४ एवढ्या संलग्नित महाविद्यालयांची संख्या बघता साधारणतः ‘अ’ श्रेणी असलेल्या लीड महाविद्यालयांच्या अंतर्गत ८ ते १० महाविद्यालयांचा समुह म्हणून या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीची योजना तयार करण्यात आली आहे. यानुसार   3/4  वर्षांच्या बहुविद्याशाखीय पदवी अंतर्गत सहा व्हर्टिकलची सुरळीत अंमलबजावणी होईल. समुह महाविद्यालयांतर्गत विविध वर्टिकल अंतर्गत बहुउद्देश्यीय आणि नाविन्यपूर्ण संयोजन शिकवण्यासाठी त्यांची संसाधने सामायिक केली जाणार ज्यामध्ये मायनर कोर्सेस, ओपन इलेक्टिव्स, व्हॅल्यू एज्युकेशन आणि को-करिक्युलर कोर्सेसचा समावेश असेल. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला अपेक्षित असलेली लवचिकता यामुळे प्रदान केली जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने या महत्त्वपूर्ण टप्प्यांतर्गत पारंपरिक पदवीचे अभ्यासक्रम तयार करण्यात आले असून उर्वरित व्यावसायिक पदवीचे अभ्यासक्रमही लवकरच तयार केले जाणार आहेत.


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाच्या दिशेनेही वाटचाल करत विविध परदेशी विद्यापीठांबरोबर शैक्षणिक सामंजस्य करार करणारे मुंबई विद्यापीठ हे राज्यातील पहिले आणि एकमेव विद्यापीठ ठरले आहे. 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अंमलबजावणीच्या अनुषंगाने मुंबई विद्यापीठाने हे एक महत्वपूर्ण पाऊल पुढे टाकले आहे. पदवीच्या या  3/4  वर्षीय अभ्यासक्रमांची आणि श्रेयांक आराखड्याची रचना करताना सर्वंकष विचार करण्यात आला असून विद्यापीठाशी संलग्नित सर्व बिगर स्वायत्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रगत, कौशल्याधिष्ठीत, बहुउद्देश्यिय, बहुआयामी आणि रोजगाराभिमुख अभ्यासक्रम शिकता येतील, अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांनी दिली. 


राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाल्यानंतर शैक्षणिक वर्ष 2023-24 पासून विद्यार्थ्यांना चार वर्षांची पदवी मिळवता येणार आहे. विद्यार्थ्यांना आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्स हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम आता चार वर्षं करता येणार आहे. यात विद्यार्थ्यांना त्यांनी निवडलेल्या एका विषयावर अधिक शिक्षण घेता येणार आहे.