राज्यात २५६० नवे कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या ७४ हजारांवर
राज्यात आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई : महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आज राज्यात 2560 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर 122 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात 996 रुग्ण आज बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
राज्यात आतापर्यंत 32 हजार 329 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत राज्यात 2487 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 74 हजार 860 इतकी झाली आहे. 39 हजार 935 कोरोना रुग्णांवर सध्या राज्यात उपचार सुरु आहेत.
राज्यातील एकूण कोरोनाबाधितांपैकी एकट्या मुंबईत 43 हजार 492 रुग्ण आहेत. तर 1417 जणांचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. धारावीत आज 19 नव्या कोरोना रुग्ण वाढले. त्यामुळे धारावीमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या 1849वर पोहचली आहे. धारावीनंतर माहिममध्येही सतत रुग्ण संख्येत वाढ होत आहे. माहिममध्ये आज 25 नवे रुग्ण आढळले असून माहिममधील एकूण संख्या 574 झाली आहे. दादरमध्येही आज 10 रुग्ण वाढले असून दादरमधील संख्या 347 इतकी झाली आहे.
ठाण्यात 10865, पालघर 1199, रायगड 1238, नाशिक 1235, पुणे 8463, सोलापूर 1032, औरंगाबाद 1653, कोल्हापूर 607, रत्नागिरी 314, सिंधुदुर्ग 78, सातारा 564, सांगलीत 126 कोरोना रुग्ण आढळले आहेत.
1 मे ते 1 जून या कालावधीत राज्यातील रुग्ण वाढीचा वेग क्रमश: कमी होत असून 1 जून रोजी तो देशाच्या सरासरीपेक्षा कमी झाला आहे. त्याशिवाय रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी वाढताना दिसत आहे.