ठाणे : कल्याण-डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे.  कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील कोरोना बाधित संख्या १३७  वर  पोहोचली आहे, तर ४५ रुग्णांना डीचार्ज देण्यात  आला आहे, शिवाय कोरोना व्हायरस या धोकादायक विषाणूने  ३ रुग्णांचा बळी घेतला आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेने कल्याण-डोंबिवलीला कन्टेन्मेंट म्हणून  झोन जाहीर केले आहे. या शहरांमध्ये फक्त मेडिकल-हॉस्पिटल सुरू राहणार असल्याचं  देखील पालिकेकडून सांगण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीत एका दिवसात कोरोना बाधित ८ नवीन रुग्ण आढळले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज समोर आलेल्या रुग्णांमध्ये एक सात वर्षांच्या मुलीचा देखील समावेश आहे. आंबिवली मोहने येथील ७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली आहे. डोंबिवली पश्चिममध्ये ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत.  तर डोंबिवली पूर्वमधील कोरोना बाधित एक रुग्णहा मुंबई येथे शासकीय परिवहन ड्रायवर आहे.


शिवाय कल्याणमध्ये देखील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. कल्याण पश्चिमस १ रुग्ण तर कल्याण पूर्वमध्ये देखील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.  तर कल्याण जवळ आंबिवली मोहने येथे दोन कोरोना बाधित रुग्ण आहेत. 


कल्याण-डोंबिवलीनंतर आता बदलापूरमध्ये देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. बदलापूरमध्ये आणखी ३ कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. बदलापूरमध्ये कोरोना बाधीत रुग्णांची संख्या आता २० वर पोहोचली असून एकाचा मृत्यू झाला आहे. 


बेलवली ,मानवपार्क आणि बदलापूर गाव या भागात रुग्ण आढळले आहेत. दोन जणांवर उल्हासनगरच्या मध्यवर्ती  रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तर एक जण बदलापूर नगरपालिकेच्या क्वारंटाइन सेंटरमध्ये आहे. 


त्याचप्रमाणे, दोघेजण मुंबई महापालिकेचे कर्मचारी तर एक जण खाजगी कंपनीत कामाला आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत तीन रुग्ण उपचार घेऊन घरी परतले आहेत. तर १६  जणांवर उपचार सुरू आहे.