मुंबई : Mumbai Metro News : मेट्रोचे मुंबईत जोरदार काम सुरु आहे. मात्र, मेट्रो कारशेडवरुन वाद सुरुच आहे. मेट्रोची कारशेड कुठे असावी, यावर आरोप-प्रत्यारोप मध्यंतरी सुरु होते. मात्र, मेट्रो कारशेड जागेवरुन होणारे आरोप-प्रत्यारोप थांबले होते. आता मेट्रो-3 जागेबाबत मिठागर आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर नवा खुलासा केला आहे. त्यामुळे यावरुन पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता आहे. तसेच एक याचिकाही दाखल करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रो - 3 कारशेडसाठीचा भूखंड हा मुळात कांजूरगावाचा भागच नाही, असा केलेला मालकी हक्काचा दावा साफ चुकीचा असल्याचा नवा खुलासा मिठागर आयुक्तांनी मुंबई उच्च न्यायालयासमोर केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्त्या प्रेमी झोरु भाथेना यांनी याचिका दाखल केली आहे. केंद्र सरकारला खरी माहिती असुनही ती दडवल्याचा सामाजिक कार्यकर्त्याचा आरोप आहे. याबाबतची सुनावणी दि. 24 जानेवारीला मुंबई उच्च न्यायालयात होणार आहे.


मेट्रो कारशेड मुंबईतील आरे येथेच योग्य आहे. त्याचे प्रत्यक्षात काम सुरु झाले होते. मात्र, महाविकास आघाडी सरकारने मुद्दामहून ही कारशेड हलविण्याचा घाट घातल्याचा आरोप, भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नवीन कारशेडला विरोध केला आहे. पूर्वी जेथे (आरे) कारशेड उभारण्यात येत होती. तीच भविष्यात उपयोगी आहे, असा दावा केला आहे.


दरम्यान, मुंबईतील जंगल वाचविण्यासाठी कांजूरमार्ग येथील जागेवर कारशेड उभारण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतला. या जागेची पाहणी करुन कामाला सुरुवातही करण्यात आली. मात्र, जागा मालकीवरुन नवा वाद उफाळला. ही जागा केंद्र सरकारची असल्याचे सांगण्यात आले. मात्र, महाराष्ट्र राज्य सरकारने ही जागा आमच्याच मालकीची असल्याचे म्हटले आहे. केंद्राचा हस्तक्षेप नको, असेही राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले. तसेच जागा मालकाचा वादही पुढे आला. आता पुन्हा या जागेवरुन नवा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे मेट्रो कारशेडचे काम पुढे मार्गी लागणार का? की वादात अडकून पडणार याचीच जोरदार चर्चा सुरु आहे.