नवी दिल्ली: मंत्र-तंत्र, जप-जाप्य आदी गोष्टींना आयुष्यात कवडीचेही स्थान न देणाऱ्या बाळासाहेबांच्या शिवसेनेची धुरा उद्धव ठाकरे यांच्या हातात आली आणि असंख्य शिवसैनिक शिवबंधनात अडकले. पुढे हे शिवबंधन तोडत अनेकांनी पक्षांतराचा रास्ता धरला हा भाग अलहीदा. पण, शिवसेना नेतृत्वाला अद्यापही अशा भावनिक गोष्टींवर भारी विश्वास असल्याचे पुढे आले आहे. शिवबंधनानंतर असंख्य शिवसैनिक आता शिव अंगठीत अडकणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या वाघांची रोखलेली बोटे आता शिव अंगठीने उजळली नाहीत तरच नवल.


व्यग्रमुखी छबी असलेल्या अंगठीचे शिवसैनिकांना आकर्षण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या (मंगळवार, २३ जानेवारी) जयंती आहे. भावनीक लाटांवर स्वार होण्याची एकही संधी न दवडणे हा शिवसेनेचा स्वभाव. त्यामुळे उद्याच्या दिवसाचे खास महत्त्व विचारात घेत पक्षाने लक्षवेधी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत असंख्य शिवसैनिकांना शिव अंगठीचे वाटप करण्यात आले आहे. शिवसेनेच्या कुलाबा विभागाने या मोहिमेत विशेष आघाडी घेतली असून, असंख्य शिवसैनिकांना शिव अंगठीचे वाटप करण्यात आले आहे. व्यग्रमुखी छबी असलेली ही अंगठी शिवसैनिकांसाठी खास आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला असून, त्यास पाठिंबाही मिळताना दिसत आहे.


मान्यवरांच्या हस्ते अंगठीचे वाटप


शिवसेनेच्या मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीत शिव अंगठीचे वाटप पार पडले. या वेळी खासदार अरविंद सावंत, विभागप्रमुख पांडूरंग सकपाळ आणि कृष्णा पवळे आदी मान्यवर उपस्थित होते. खासदार सावंत यांनी  विभागातील सुमारे ८०० शिवसैनिकांना या अंगठ्यांचं स्वहस्ते वाटप केलं.


व्याघ्रमुखी अंगठी शिवसेनेला लाभणार?


बाळासाहेबांचे निधन त्यातही खास करून २०१४ नंतर राज्य आणि देशातील बदलते राजकारण याची शिवसेनेला पक्की जाण आहे. त्यामुळे आगामी विधानसभा डोळ्यासमोर ठेवत शिवसेनेने आपल्या भात्यातील बाण अधिक सुरक्षीत करत धनुष्य ताणायला सुरूवात केली आहे. वाघाची छबी असलेली अंगठी हा सुद्धा त्यातलाच एक भाग. या आधीही शिवसेनेने असा प्रयोग करून पाहिला आहे. मात्र, त्या वेळी शिवसैनिक शिवबंधनात अडकले होते. ज्याचा पक्षाला फायदा झाल्याचे शिवसेना नेते सांगतात. आता व्याघ्रमुखी अंगठी शिवसेनेला किती लाभते याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.