मुंबई : आता बातमी झी 24 तासच्या दणक्याची. ओबीसी शिष्यवृत्तीच्या अनुदानात भली मोठी कपात केल्याची बातमी झी २४ तासवर गुरुवारी प्रसारित केल्यानंतर, चोवीस तासाच्या आतच त्याचे पडसाद राज्याच्या विधानसभेत उमटले. ओबीसी शिष्यवृत्तीत कपातीबाबत स्वतः मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं. केंद्रानं दहा वर्षं पैसेच दिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी 24 तासच्या बातमीचा दुसरा दणका दिसून आला, तो महिला क्रिकेटपटूंबाबत. 'झी 24 तास'च्या बातमीनंतर अखेर राज्यसरकारला जाग आली आणि  विधानसभेत महिला वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करणा-या महाराष्ट्राच्या कन्यांसाठी 50 लाखांच्या बक्षिसाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली. विधानसभेत भारतीय टीममधील महाराष्ट्राच्या क्रिकेटपटूंच्या अभिनंदनाचा प्रस्ताव एक मतानं मान्य करण्यात आला. 


तर दणक्याची तिसरी बातमी आहे ती वसईमध्ये टँकर माफियांकडून रस्त्याकडेला साचलेलं घाणेरडं पाणी टँकरमध्ये भरलं जात असल्यासंबंधीची. झी मीडियानं ही बातमी दाखवल्यावर जाग्या झालेल्या प्रशासनानं तातडीने कारवाई करत हा उपसा बंद पाडला आहे. ज्या भागात हा टँकर पाणी उपसा करत होता तिथले मार्ग बंद करण्यात आलेत. वसईतल्या मधुबन परिसराच्या मागच्या बाजूला साचलेलं पावसाचं पाणी टँकरमध्ये भरुन सोसायट्यांना पुरवलं जात होतं.