मुंबई: कोरोना व्हायरसविरुद्ध सुरु असलेल्या लढाईच्या निर्णायक टप्प्यावर आपण उभे आहोत. पुढील १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे आहेत. याअगोदर आपण कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या टप्प्यात होतो. मात्र, आगामी काळात कोरोनाच्या रुग्णांची झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी स्वयंशिस्त पाळत घराबाहेर पडूच नये, असे कळकळीचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी रात्री फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी यावेळी त्यांनी म्हटले की, आपण कोरोना प्रादुर्भावाच्या महत्त्वाच्या टप्प्यात प्रवेश केला आहे. गेल्या काही दिवसांत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु, आशादायक गोष्ट म्हणजे वेळेत उपचारासाठी दाखल झालेले रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे योग्यवेळी खबरदारी घेतली तर आपण या संकटातून बाहेर पडू शकतो, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यातील खासगी डॉक्टरांनाही मदतीचे आवाहन केले. कृपा करून खासगी डॉक्टरांनी दवाखाने बंद करू नयेत. तुमच्याकडे आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली तर त्यांना ताबडतोब रुग्णालात पाठवा, असे उद्धव यांनी म्हटले. तसेच परराज्यात अडकलेल्या मराठी लोकांना पुढील काही दिवस राज्यात परतण्याचा प्रयत्न करू नये. मी संबंधित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. त्यामुळे परराज्यात अडकून पडलेल्या लोकांची त्याठिकाणी योग्य व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

मला माहिती आहे की, अनेकांना घरी बसून कंटाळा आला असेल. परंतु, आपल्याला आणखी काही काळ थांबण्याची गरज आहे. सुरुवातीच्या काळात कोरोनाविषयी जागरुकता नसल्यामुळे अनेक परदेशी लोकांची तपासणी झाली नाही. त्यामुळे आता नकळतपणे त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसायला सुरुवात होईल. परंतु, त्यामुळे एकदम घाबरून जाऊ नका. मात्र, अजूनही परदेशातील आलेल्या लोकांनी स्वत:ची तपासणी केली नसेल तर ती करून घ्यावी. ही गोष्ट लपवून ठेवू नका, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.